गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी मुले चोरायचे मोबाईल; चोरीचा आकडा ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

Chhatrapati Sambhaji Nagar crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. अशातच पोलिसांनी मोबाई चोरीच्या घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या मुलांनी तब्बल 300 मोबाईल चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 17, 2023, 02:00 PM IST
गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी मुले चोरायचे मोबाईल; चोरीचा आकडा ऐकून पोलिसांनाही बसला धक्का title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : पालकांनो मुलांकडं लक्ष द्या असं आम्ही सांगतोय याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरात (chhatrapati sambhaji nagar) तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी (Chhatrapati Sambhaji Nagar Police) पकडल्यानंतर समोर आलेलं सत्य आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ताब्यात घेतलेल्या मुलांकडून पोलिसांनी तब्बल 40 मोबाईल जप्त केले. आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी ते मोबाईल चोरायचे आणि आमच्याकडे महागडे मोबाईल आहेत असं दाखवायचे. पोलिसांकडे वारंवार मोबाईल चोरीच्या घटना समोर येऊ लागल्याने त्यांना हे प्रकरण गांभीर्याने घेत याचा सखोल तपास केला. तपासानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना मोबाईल चोरीच्या आरोपांखाली ताब्यात घेतलं आहे.

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तपासानंतर हा सगळा प्रकार उघड केला आहे. प्रेयसीला खुश करण्यासाठी तिघेजण मोबाईलची चोरी करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत आरोपींनी 300 पेक्षा अधिक मोबाईल चोरले असल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांच्या कारवाईत 40 मोबाईलच जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांपैकी एका मुलाने त्याच्या दोन मित्रांना सोबत घेऊन हा सगळा प्रकार केला आहे. या प्रकरणाचा सुत्रधार असलेल्या मुलाचे आई वडील खाजगी नोकरी करतात. मात्र मुलाला मोबाईल चोरीचा नाद लागला आणि त्याने दोन मित्र सोबत घेत 300 पेक्षा अधिक मोबाईल चोरले. हे सगळं फक्त आणि फक्त मैत्रिणींना खुश करण्यासाठी सुरु होतं असे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

छत्रपती संभाजी नगरात हा सगळ प्रकार उघडकीस आला आहे. कधी चालत्या ट्रेनमधून तर कधी रेल्वेचा वेग कमी झाल्यावर पायरीवर बसलेल्या माणसाचा मोबाईल हिसकावून या चोरीच्या घटना घडवल्या जात होत्या. यातील काही मोबाईल विकताना पोलिसांना हे त्रिकुट सापडले. 50 हजारांचा मोबाईल हे त्रिकुट अवघ्या 5 हजार रुपयांना विकायचे. अशाच विक्रीच्या संपर्कातून पोलिसांनी या अल्पवयीन मुलांना पकडले आणि सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी त्यांच्याकडून तूर्तास 40 मोबाईल जप्त केले आहेत.

दरम्यान, यातील मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे आई-वडील आणि बहिण भाऊ सुद्धा नोकरी करतात. तो घरी एकटाच असायचा. त्यातून मैत्रिणींवर पैसे खर्च करण्यासाठी त्यांने ही युक्ती शोधून काढली होती. दोन मित्र सोबत घेऊन गेली कित्येक दिवस हा प्रकार सुरू होता. त्यामुळे पालकांनो मुलांकडं लक्ष ठेवा अशी म्हणण्याची निश्चितपणे वेळ आली आहे.