Jaydeep Apte Arrest: घरातल्या व्यक्तीनेच पोलिसांना दिली Tip; रात्री नेमकं काय घडलं? थरारक घटनाक्रम

How Jaydeep Apte Arrested: 26 ऑगस्टपासून कल्याणबरोबरच महाराष्ट्र पोलिसांच्या एकूण सात टीम जयदीप आपटेच्या मागावर होत्या. जयदीप आपटेला अखेर कल्याणमधील त्याच्या घरातूनच अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 5, 2024, 09:56 AM IST
Jaydeep Apte Arrest: घरातल्या व्यक्तीनेच पोलिसांना दिली Tip; रात्री नेमकं काय घडलं? थरारक घटनाक्रम title=
बुधवारी पोलिसांनी केली अटक

How Jaydeep Apte Arrested: सिंधुदुर्गमधील मलावण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेल्या पुतळ्याचा मूर्तीकार आणि कंत्राटदार जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. 26 ऑगस्ट रोजी ही दुर्घटना घडल्यापासून जयदीप आपटे फरार होता. कल्याण पोलिसांनी बुधवारी रात्री त्याला कल्याणमधील घरातून अटक केली. महाराष्ट्र पोलिसांच्या सात तुकड्या मागील काही दिवसांपासून जयदीप आपटेच्या मागावर होत्या. रात्री उशीरा जयदीप आपटेला अटक केल्यानंतर त्याला पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामधील कोठडीत ठेवण्यात आलेलं. आता जयदीपला अटक कशी केली याबद्दलचा तपशील समोर आला आहे.

घरातल्या व्यक्तीनेच दिली टीप 

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, जयदीप आपटेला अटक होण्यामागे त्याच्या पत्नीची भूमिका महत्त्वाची ठरली. जयदीप आपटेच्या पत्नीनेच तो येणार असल्याची माहिती पोलिसांना दिल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे जयदीपचे नातेवाईक आणि मित्रही त्याला आत्मसमर्पण करण्याचा सल्ला देत होते अशी माहिती समोर येत आहे. जयदीप आपटेला बुधवारी पोलिसांनी त्याच्या कल्याणच्या घराबाहेरच अटक केली. जयदीप आपटे त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता. जयदीप त्याच्या पत्नीच्या संपर्कात होता. त्याने तिला फोन करुन आपण घरी येत असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप चिंतेत होता. आत्मसमर्पण करण्याच्या तयारीनेच तो घरच्यांशी चर्चा करायला आलेला. तपासामध्ये सहकार्य करण्याची आपली इच्छा असल्याचं त्याने म्हटलं होतं. 

आधीच पत्नी आणि आईची झालेली चौकशी

जयदीप आपटेला ज्या घरातून अटक केली त्याच घरी जाऊन पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी केली होती. पोलिसांनी यावेळी जयदीपच्या आईची आणि पत्नीची चौकशी केली होती. जयदीप आपटेचे काही नातेवाईक शहापूरमध्ये राहतात. त्यामुळे पोलिसांनी तिथेही जाऊनही पोलिसांनी चौकशी केली होती. 4 सप्टेंबर रोजी रात्री अंधाराचा फायदा घेऊन जयदीप आपटे कल्याणमधील घरी आला. पोलिसांची नजर चुकवून आपण आई आणि पत्नीची भेट घेऊन आत्मसमर्पण करण्यासंदर्भात चर्चा करुन पुढील निर्णय घ्यावा असा जयदीपचा मानस होता. जयदीप भेटीला येणार आणि आत्मसमर्पण करणार हे आधीच ठरलं होतं असा दावा त्याचे वकील गणेश सोवणे यांनी केली आहे. अटक केल्यानंतर जयदीपला सिंधुदुर्ग क्राइम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नक्की वाचा >> कंत्राट कसं मिळालं? कुठे लपलेला? पुतळ्याच्या कपाळावर... 'या' 8 प्रश्नांची उत्तरं देणार जयदीप आपटे?

आरोपीचे वकील काय म्हणाले?

या प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं जात आहे. त्यामुळं या प्रकरणाला आणखी फाटे फुटू नयेत सर्व शांततेत व्हावे अशी आमची इच्छा होती. त्यानुसार या सर्व प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी न घेता जयदीपने स्वतः आत्मसमर्पण करण्याचं ठरवलं होतं. पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं आम्ही उचित समजलं. त्याप्रमाणे कुटुंबीयांसोबत चर्चा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला येऊन स्वतःल आत्मसमर्पण करेल आणि पुढची सर्व न्यायालय प्रक्रिया होईल असा निर्णय आम्ही मंगळवारीच घेतला होता. त्यानुसारच सर्व घडलं. कोणतीही लपाछपी करायची आम्हाला गरज नव्हती, असं गणेश सोवणे यांनी म्हटलं आहे.