ज्याला घर दिले त्यानेच संपूर्ण कुटुंबाला संपवले; नेहरोलीतील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले

Wada Crime News: वाडा तालुक्यातील नेहरोली येथील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 5, 2024, 08:12 AM IST
ज्याला घर दिले त्यानेच संपूर्ण कुटुंबाला संपवले; नेहरोलीतील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले title=
wada crime news Family of three found murdered in their house tenet killed over money

Wada Crime News: वाडा तालुक्यातील नेहरोली येथील एका घरात तिघांचे मृतदेह सापडले होते. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असू शकतो असा संशय व्यक्त केला होता. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर त्यांची हत्याच झाल्याचे समोर आले होते. आता या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला असून आरोपी हा त्यांचाच भाडेकरु असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील नेहरोली येथील बोंद्रे आळी या ठिकाणी राहणारे मुकुंद बेचलदास राठोड हे त्यांच्या पत्नी व मुलीसह राहत होते. तर, त्यांची दोन्ही मुलं नोकरीनिमित्त मुंबईत राहतात. आठ दिवसांपासून मुलांच्या त्यांच्यासोबत काहीच संपर्क न झाल्याने त्यांचा मुलगा सुहास या गावात आला. मात्र, घराला कुलुप पाहून त्याने इतरत्र चौकशी करण्यास सुरुवात केली. पण काहीच माहिती मिळाली नाही. 

सुहास याने अखेर घराचे कुलूप तोडून घरात गेला. मात्र, घरात शिरताच त्याला दुर्गंधी आली. तेव्हा बाथरुमच्या दरवाज्यात वडिलांचा मृतदेह आढळला. तेव्हा त्याने पोलिसांत धाव घेत याबाबत माहिती दिली. पोलिसांनाही सूचना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराची छाडाछडती घेताच घरातील पत्र्याच्या पेटीत आई व मुलीचा मृतदेह आढळला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, नंतर ही हत्याच असल्याचे समोर आले. 

मुकुंद राठोड हे गेल्या 25 वर्षांपासून नेहरोली येथे राहतात. त्यांनी तिथेच एक जागा घेऊन इमारत बांधली होती. त्याच इमारतीत ते स्वतः राहत होते व भाडेकरुंनाही जागा दिली होती. याच इमारतीत भाडेकरु म्हणून राहणारा आरिफ हा मुळचा उत्तर प्रदेशातील होता. राठोड यांच्या घरात पैशांचे घबाड मिळेल या उद्देशाने त्याने सर्वप्रथम मुली वर तिच्या आईवर लोखंडी रॉडने वार करुन त्यांना ठार केले. त्यानंतर पत्र्याच्या बंद पेटीत त्यांचे मृतदेह ठेवून दिले. जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा मुकुंद घराबाहेर होते. त्यामुळं आरोपी घरात त्यांची वाट पाहत दबा धरुन बसला होता. 

मुकुंद हे घरात घेताच दबा धरुन बसलेल्या आरोपीने त्यांच्यावर रॉडने वार केले. त्यानंतर तिथून फरार झाला. वाडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथके रवाना केली होती. अखेर उत्तर प्रदेशातून आरोपी आरिफला अटक करण्यात आली.