राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत असून त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकमेकांवर शाब्दिक बाण मारण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना यांना नाक खाजवायलाही मॅडमची परवानगी लागते असा टोला लगावला. तसंच तीन राज्यात भाजपाची सत्ता आल्याने नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं आहे.
"आम्ही दिल्लीत गेलो की म्हणतात, यांचा स्वाभिमान हरवला आहे, कटपुतली आहेत. ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही खाजवता येत नाही, त्यांनी आमच्यावर आरोप तसंच स्वाभिमानाची भाषा करु नये. आम्ही दिल्लीत जातो, निधी आणतो. मागील अडीच वर्षात अहंकारामुळेच राज्याचं नुकसान झालं. यांनी अहंकारामुळे अनेक प्रकल्प बंद पाडले. आमचं सरकार आल्यानंतर मेट्रो, आरे, समृद्धी सगळे प्रकल्प मार्गी लागले. विकासाच्या बाता त्यांनी मारु नयेत. तीन राज्यातील निकालांनी यांचं सत्ता काबीज करण्याचं स्वप्न साफ केलं आहे. यांचे सत्ता काबीज करण्याचे दोर कापले गेले आहेत," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
"चहापान म्हणजे विरोधकांच्या काही सूचना, चर्चा वैगेरे असतं. पण नेहमीप्रमाणे त्यांनी चहापानावर बहिष्कार घातला आहे. विरोधकांचा न्यायालय, यंत्रणा, पत्रकारांवर विश्वास नाही. जे प्रश्न विचारतील ते वाईट असंच त्यांना वाटत आहे. अवसान गळालेला, आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष कसा असतो हे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळतं. पत्रातून त्यांनी आताच अंतिम आठवड्याचा प्रस्ताव दिला आहे," असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
"मोदींचा करिश्मा संपला म्हणणा-यांना जनतेने दाखवून दिलं आहे. 3 राज्यात घवघवीत यश मिळालं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची शाश्वती जनतेने दिली आहे. त्यांनी आता बोलण्याआधी आपल्याकडे पाहावं," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"विदर्भात अधिवेशन असताना विदर्भाच्या प्रश्नांना महत्त्व दिलं पाहिजे. विदर्भाशी आमचं एक नातं आहे. लोकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प पूर्ण केले जातील असं आश्वासन देतो," असंही त्यांनी सांगितलं.
"आम्ही 10 हजार कोटीपर्यंत रक्कम शेतक-यांना दिली. शेतकऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार यांना नाही. जे कधी घराबाहेर पडले नाहीत ते शेतकऱ्यांच्या बांधावर जायच्या बाता करतात. आम्ही शेतक-यांच्या तोंडाला पाणी पुसणार नाही," असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.
पुढे ते म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नसल्याची आमची भूमिका आहे. मागच्या सरकारच्या चुकीमुळे आरक्षण गेले. आम्ही टिकणारे आरक्षण देणार".