बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षीय चिमुरड्याला जीवदान

बालदिनी एका लहानग्याचे प्राण वाचल्याने सर्वांनाच हायसं वाटलं

Updated: Nov 14, 2019, 02:50 PM IST
बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षीय चिमुरड्याला जीवदान title=

निलेश वाघ, झी २४ तास, कळवण : नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या बेज गावात शेतात खेळत असताना बोअरवेलमध्ये पडलेल्या एका सहा वर्षाच्या बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. यामुळे, स्थानिक प्रशासन व स्थानिकांनीही सुटकेचा निश्वास टाकलाय. बालकाची प्रकृती सुखरुप असून त्याच्यावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. बालदिनी एका लहानग्याचे प्राण वाचल्याने सर्वांनाच हायसं वाटलं. 

रितेश जवंशिग सोळुंकी असं या सहा वर्षांच्या चिमुरड्याचं नाव आहे. रितेशचे आई - वडील मुळचे मध्यप्रदेशातील सेंधवा  येथील रहिवासी आहेत. शेतमजुरिसाठी ते बेज गावात आले. गुरुवारी सकाळी चिमुरडा रितेश शेतात खेळत होता. यावेळी, त्याचे आई-वडील शेतात काम करत होते. 

Image preview
बोअरवेलमध्ये पडलेला चिमुरडा सुखरुप

रितेश खेळता खेळताच सुमारे २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. मात्र, सुदैवाने ५० फुटांवरच अडकला. महसूल यंत्रणा, पोलीस व स्थानिक तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर मदतकार्य सुरू झालं... आणि खोदकाम करून रितेशला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. रितेशची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.