अमरावती : महाराष्ट्रात धक्कादायक तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. बालविवाहाला बंदी असतानाही एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देण्यात आलं. यानंतर पतीने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्तापित केले. सासरच्या लोकांना कंटाळून ती पीडित मुलगी माहेरी आली तर माहेरी तिच्या आईने तिला मारहाण केली.
नेमकी घटना काय?
अमरावतीतल्या वरुड तालुक्यातील एका गावातील14 वर्षीय मुलीचा मध्यप्रदेशात जुन्नरदेव तालुक्यातील एका गावात 2021 मध्ये बालविवाह करण्यात आला. तिथे त्या मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आला. यावेळी सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली.
पण माहेरी आईने नवऱ्याकडे का जात नाही म्हणून तिला मारहाण केली. अखेर 22 एप्रिल रोजी तिने वरुड पोलिस ठाणे गाठून सर्व आपबिती पोलिसांना सांगितली. यानंतर पोलिसांकडून तपास करून पोलिस अधीक्षक आणि एचडीपी यांच्या मार्गदर्शनात 14 मे रोजी पीडित मुलीच्या आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.
पाच जणांवर गुन्हा दाखल
पती, सासू, मामा आणि मध्यस्थी करणाऱ्यांसह एकूण पाच जणांविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व घटनाक्रम 1 एप्रिल 2021 ते 12 मे 2022 दरम्यान घडला आहे. ही घटना उघडकीस येताच वरुड पोलिसांनी गुन्हे दाखल करून ती केस मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नवेगाव पोलीस ठाण्यात वर्ग केली आहे.
घटनास्थळ मध्यप्रदेशातील असल्याने तो गुन्हा मध्यप्रदेशातील जुन्नरदेव तालुक्यातील नायगाव पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.