अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होणं किती धोकादायक ठरु शकतं, ते नागपुरातील दोन घटनांमुळे परत एकदा अधोरेखित झाले आहे.
टोकदार खिळ्याशी खेळणं सात वर्षीय हिमांशू क्षीरसागरच्या चांगलंच अंगाशी आलं होतं. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात बोपेश्वर गावातला हिमांशू चार इंचाच्या टोकदार खिळ्यानं दात कोरत होता. दात कोरता कोरता त्याला झोप लागली आणि तो खिळा नकळत हिमांशूच्या पोटात गेला. खिळा पोटात गेल्याचं समजताच त्याच्या पालकांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
मात्र प्रकरणाची गंभीरता पाहून हिमांशूला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. हिमांशूवर उपचार करण्याआधी खिळा कसा काढायचा? याचं प्रात्यक्षिक डॉक्टरांनी केलं. यानंतर विशेष उपकरणांच्या आधारे पोटात अडकलेला खिळा अलगद बाहेर काढण्यात आला.
अशीच काहीशी घटना मोर्शी तालुक्याच्या बऱ्हाणपूर गावातल्या परी भोंडेबाबतही घडली. तीन वर्षाच्या या चिमुरडीनं घड्याळामध्ये वापरली जाणारी बॅटरीच गिळली. हिमांशूवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच परीवरही उपचार केले होते. हे डॉक्टर हिमांशू आणि परीसाठी देवदूत ठरले आहेत.
टोकदार खिळा असो किंवा मग घड्याळाची बॅटरी या दोन्ही गोष्टी या लहानग्यांच्या जीवावर बेतल्या असत्या. त्यांच्या पोटाला, आतड्यांना किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवाला इजा झाली असती, या विचारानंच अंगाचा थरकाप उडतो. डॉक्टरांनी आपलं कौशल्य पणाला लावत त्यांच्यावर यशस्वी उपचार केलेत. तरीही आपली मुलं काय करतात याकडं लक्ष देण्याची जबाबदारी सर्वस्वीपणे पालकांची आहे.