ठाण्यात आता वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प, मंत्रिमंडळाची मंजुरी

ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प तयार करण्यात येणार आहे.  

Updated: Mar 5, 2019, 10:38 PM IST
ठाण्यात आता वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प, मंत्रिमंडळाची मंजुरी title=
संग्रहित छाया

मुंबई : ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगर पालिकेने जलद वाहतूक प्रणाली म्हणून ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रणालीची शिफारस राज्य सरकारला करण्यात आली होती. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ठाणे पालिकेच्या वाहतूक समस्या सोडविण्याचा या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने या वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था जलद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्यातील दाट वस्तीच्या भागातील वाहतुकीची समस्या यामुळे सुटण्यास मदत होईल.

 ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुकीची वाढती गरज भागविण्यासाठी कॉम्प्रिहेन्सीव्ह मोबिलिटी प्लान तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये जलद वाहतूक प्रणाली म्हणून ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रणालीची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने या मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्पदेखील मंजूर केला. या अहवालास आता शासनानेही मान्यता दिली आहे.

२९ किमीचा हा प्रकल्प

ठाणे शहर अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प हा नवीन ठाणे ते ठाणे या दरम्यान २९ किमी अंतराचा असेल. यामध्ये २० उन्नत तर दोन भुयारी अशी एकूण २२ स्थानके असतील. सुमारे १३ हजार ९५ कोटींच्या या प्रकल्पामुळे २०२५  मध्ये दररोज ५ लाख ७६ हजार तर २०४५ मध्ये दररोज ८ लाख ७२ हजार प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. 

ही असणार प्रमुख स्थानके

नवीन ठाणे, रायला देवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाई नगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबिळ, वॉटर फ्रंट, पाटलीपाडा, आझादनगर बस स्थानक, मनोरमा नगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे स्टेशन ही स्थानके यामध्ये प्रस्तावित आहेत. 

... म्हणून वर्तुळाकार मेट्रो रेल्वे

ठाणे शहरातील सर्व मेट्रो मार्गिकांच्या दरात एकवाक्यता रहावी म्हणून वर्तुळाकार मेट्रोचे दर हे मेट्रो ४ वडाळा-घाटकोपर-मुलूंड-ठाणे-कासारवडवली या मार्गिकेनुसार राहणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) मार्फत करण्यात येईल. तसेच, हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.