गेल्या 2 वर्षात 600 निर्णय घेतले पण लाडकी बहीण योजनेखाली सर्व...'- मुख्यमंत्री

CM Eknath Shinde On Ladaki Bahin Yojna: गेल्या 2 वर्षांत आम्ही 600 निर्णय घेतले. मात्र अनेक निर्णय हे लाडकी बहीण योजनेखाली दबून गेलेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 8, 2024, 01:45 PM IST
 गेल्या 2 वर्षात 600 निर्णय घेतले पण लाडकी बहीण योजनेखाली सर्व...'- मुख्यमंत्री title=
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde On Ladaki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आळंदी येथील कार्यक्रमात वारकऱ्यांना संबोधित केले. माझ्या आयुष्यातील आजचा कार्यक्रम हा सर्वात आगळा-वेगळा आहे. वारकऱ्यांमध्ये येण्याचं भाग्य लाभतं, याहून दुसरं पुण्य काहीचं नाही. आज गुरू-शिष्यांचा वाढदिवस आहे, यापेक्षा मोठं काय असू शकतं. खरं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असलो किंवा सरकार असलो तरी राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं स्थान नक्कीच मोठं आहे. राजकीय मंडळी ही आपल्या समोर नतमस्तक होतात. कारण वारकरी एक फॅक्टरी आहे, जिथं समाज तयार केला जातो. म्हणूनचं आनंद दिघे नेहमी वारकरी संप्रदाय समूहात मला घेऊन यायचे, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

गेल्या 2 वर्षांत आम्ही 600 निर्णय घेतले. मात्र अनेक निर्णय हे लाडकी बहीण योजनेखाली दबून गेलेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

एसटी फायद्यात आली

लाडक्या बहिणीला आपण एसटी तिकीटात पन्नास टक्के सवलत दिली. त्यामुळं बहीण भावजींना म्हणते आता तुम्ही घरीच बसा, मी बाजार करून येते. हा निर्णय घेताना एसटी तोट्यात येईल, असं बोललं गेलं. पण आज हीच एसटी फायद्यात आली आहे. असं म्हणत लाडकी बहिण योजनेवर आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. 

एकनाथ शिंदेला काय स्वतःसाठी वेळ ठेवणार की नाही? 

आम्ही 2 काय करणार सांगा? इतके मोर्चे-आंदोलने येतायेत. सगळे म्हणतात 40 वर्ष, 25 वर्ष, 15 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. ते मी सोडवण्याची अपेक्षा आहे. पण या एकनाथ शिंदेला काय स्वतःसाठी वेळ ठेवणार की नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

 सरकारने आणलेल्या योजना फसव्या असल्याच्या अफवा

एकनाथ शिंदे आयुष्यात कधी खोटं बोलला नाही, कधी ही फसवणार नाही. मात्र सरकारने आणलेल्या योजना फसव्या असल्याच्या अफवा उठवल्या जातायेत.माझ्याकडे येणारा एक ही व्यक्ती खाली हाती जाणार नाही, एवढी मोठी शक्ती मला द्यावी. असं मागणं मी परमेश्वराकडे करतो, असे ते यावेळी म्हणाले. 

काश्मीरमध्ये जिथं तिरंगा फडकविण्याची हिंमत कोणी करत नव्हतं, आज त्याच ठिकाणी मराठी माणूस गणेशोत्सव साजरा करतोय. ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.