"बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधानांनी पूर्ण केले"; चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Chandrakant Patil : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण तिथे अयोध्येत शिवसेना गेली होती का? बाळासाहेब गेले होते का? असे विधान केल्यामुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना शिंदे गटालाही लक्ष्य केले आहे.

Updated: Apr 11, 2023, 01:57 PM IST
"बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधानांनी पूर्ण केले"; चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण title=

Babri Mosque Demolition : बाबरी मशीद (Babri Mosque) उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा (Shivsena) सहभाग नव्हता, असा दावा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांनी 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' या कार्यक्रमात घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटलांनी हा दावा केला आहे. आपण त्यावेळी व्यवस्थापनासंदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये स्वत: उपस्थित होतो असाही दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबत स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

"त्यावेळी ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते? बाबरी ज्यांनी पाडली ते कदापी शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर नेऊन ठेवलं होतं. संध्याकाळच्या सभा होणं, संताची व्यवस्था वगैरे ठेवली होती. काहीही होवो, ढाचा पडो न पडो पण सगळ्यात शेवटी तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं असं सांगितलं होतं.  त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेबांनी म्हटलं की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणून तुम्ही काय तुमचे चार सरदार तिथे पाठवले होते का?," असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

"संजय राऊतांना कोण विचारतं. चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे होते की, माजी मुख्यमंत्री त्यावेळी कुठे होते. अयोध्येमध्ये जेव्हा वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असे उद्गार काढले. त्यावेळी गर्व से कहो हम हिंदू हे अशी घोषणा त्यांनी दिली. लखनऊच्या कोर्टातही बाळासाहेब गेले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी परखड भूमिका घेतली हे जगजाहिर आहे. आता जे बोलतायत त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्यांनी अयोध्येला विरोध केला त्यांच्यासोबत ते होते. बाळासाहेबांचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही.  मला त्यांच्यावर उत्तर देण्याची गरज वाटत नाही. आमची श्रद्धा अयोध्येशी आहे," असे एकनाथ शिंदे म्हणाले.