... तर अखंडित वीज पुरवठा होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले.  

Updated: Jun 6, 2020, 01:48 PM IST
... तर अखंडित वीज पुरवठा होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे title=
छाया सौजन्य - twitter @CMO

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. या कोळसा खाणीमुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यामुळे उद्योगाला यामुळे चालना मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात पहिलाच नवीन प्रकल्प सुरु होत आहे. आपण दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपूर्णपणे उपयोगात आणली तर वीज निर्मितीचा प्रश्नही संपुष्टात येईल. संपूर्ण ग्रामीण भागाला अव्याहतपणे परवडणाऱ्या दरात व अखंडित वीज पुरवठा करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  कोळसा खाणींमधून निघणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रदूषित होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचतो, श्वसन व इतर आजार उद्भवतात. कोळशातील राखेचे प्रमाण कमी करण्यासाठी कोळसा धुण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे  झाल्यास प्रमाण खूप कमी होऊ शकते. त्यासाठी वॉशरीज चांगल्या हव्यात, असेही ते म्हणाले. 

 वेस्टर्न कोल फिल्डच्या नागपूर जवळील आदासा या कोळशाच्या खाणीचा ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी हे सुध्दा ऑनलाइन शुभारंभात सहभागी झालेत. दरम्यान, आदासा येथील खाणीत ३३५ कोटी रुपये गुंतवणूक होत आहे. १.५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन होईल. याच वर्षी ही खाण सुरु होणार आहे.  

राज्यात १४ खाणी सुरु होणार आहेत. येणाऱ्या चार वर्षांत महाराष्ट्रात १४ खाणी सुरु होत आहेत आणि त्यातील तीन याच वर्षी सुरु करण्याचे आपण ठरविले आहे. या खाणींमुळे ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे १३ हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती यावेलो वेस्टर्न कोलफिल्डने दिली.

 दरम्यान, एकूण तीन खाणींचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. उर्वरित दोन मध्यप्रदेशमधील आहेत. या शुभरंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील ऑनलाईन सहभागी झालेत.