नाशिक : नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधल्या सदस्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक होत आहेत. डॉक्टर्सशी संबंधित असलेल्या काही ग्रुपमधील सदस्यांचे व्हाट्सअॅप अकाऊंटस हॅक झाल्याचे प्रकार घडू लागले आहेत. डॉ. नीलेश सुदाम दाते आणि गौरी पिंप्रोळकर यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये या घटनेबद्दल तक्रार केली आहे.
अज्ञात व्यक्ती एखाद्या व्यक्तीचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक केल्यानंतर सदर व्यक्तीच्या अकाऊंटमधील इतर ओळखीच्या व्यक्तींना व्हॉट्सअॅप करून ओटीपी जनरेट करून त्या ओटीपीची मागणी करतो. हा ओटीपी मिळताच संबंधित अकाउंटसुध्दा हॅक होत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले की, नागरिकांनी व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित करून घ्यावे तसेच अनोळखी आणि ओळखीच्या व्यक्तीने ओटीपीची मागणी केल्यास ओटीपी देऊ नये. आपले अकाउंट व्हॉट्सअॅपच्या 'टू स्टेप व्हेरीफीकेशन'मध्ये जाऊन सुरक्षित करावे.