सख्ये भाऊ अमित, धीरज निवडणुकीच्या आखाड्यात, लातूरचा गड काँग्रेस सर करणार का?

लातूरमध्ये सख्ये भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार.

Updated: Sep 26, 2019, 06:17 PM IST
सख्ये भाऊ अमित, धीरज निवडणुकीच्या आखाड्यात, लातूरचा गड काँग्रेस सर करणार का?  title=
संग्रहित छाया

शशिकांत पाटील, लातूर : येथे काँग्रेस नेतृत्वाची धुरा विद्यमान आमदार अमित देशमुख हे सांभाळत आहेत. मात्र २०१४ च्या मोदी लाटेनंतर काँग्रेसचा गड असणारा लातूर जिल्हा हा आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती या भाजपच्या ताब्यात आहेत. तर लातूर जिल्हा परिषद आणि लातूर महानगरपालिकेवरही भाजपने आपले कमळ फुलविले आहे. 

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरमध्ये काँग्रेस भरभक्कम ठेवणारे अमित आणि धीरज देशमुख. अमित विद्यमान आमदार आहेत. तर धीरज देशमुख यंदाच्या निवडणुकीत आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. अमित देशमुख. त्यांचं दिसणं विलासरावांसारखं, बोलणं, वागणं, आवाज सगळं काही अगदी विलासरावांसारखंच. त्यामुळे त्यांच्याभोवती वलय दिसून येत आहे.

संग्रहित छाया

२००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा अमित देशमुख निवडून आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काही काळ राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. आता तिसऱ्यांदा ते विधानसभेच्या आखाड्यात उतरत आहेत. 

विलासराव देशमुखांच्या निधनानंतर अमित देशमुखांनी लातूर जिल्हा काँग्रेसची धुरा समर्थपणे पेलली. इंजिनिअर असलेले अमित देशमुख १९९९ पासून ते लातूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. २००८ मध्ये त्यांचा विवाह अभिनेत्री अदिती घोरपडे यांच्याशी झाला आहे.

धीरज देशमुख. अमित, रितेशनंतर देशमुखांची ही धाकटी पाती. लंडमधून धीरज देशमुख यांनी एमबीए केले आहे. चित्रपट निर्माते वासू भगनानी यांची मुलगी दीपशिखाशी त्यांचा विवाह झाला आहे. लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून २०१३ पासून धीरज राजकारणात सक्रिय झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचे त्यांचं स्वप्न भाजपने पूर्ण होऊ दिले नाही, पण  लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख यांनी मांजरा, विकास आणि रेणा साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकाराचे मोठं जाळे तयार केले आहे. याच्याच जोरावर ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. आता ते लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलण्याची शक्यता आहे.  

अमित देशमुख यांच्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत अख्खे देशमुख कुटुंब प्रचारात उतरले होते. आता देशमुख बंधू लढणार म्हणजे काका दिलीपराव देशमुख, आई वैशाली देशमुख, भाऊ अभिनेता रितेश आणि त्याची पत्नी जेनिलिया देशमुख असे सगळे आता पुन्हा प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे लातूरमध्ये देशमुख कुटुंबाची जोरदार चर्चा आहे.