मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरील विधानामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत:वर नाराजी ओढवून घेतली आहे. राऊत यांनी हे विधान आता मागे घेतले असले तरी विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील या प्रकरणावर वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचे होते, त्यावर आमची नाराजी होती, ती आम्ही उद्धव ठाकरे यांना कळवली असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
आता संजय राऊत यांनी वक्तव्य मागे घेतलं आहे. भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला आहे. या गोष्टी टाळल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.
अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटी व्हायच्या, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी काल केलं होतं. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता संजय राऊत यांनी हे वक्तव्य मागे घेतलं आहे. काँग्रेसमधल्या आमच्या मित्रांनी दुखावलं जाण्याची गरज नाही. या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन झाली असं त्यांना वाटत असेल, तसंच कुणी दुखावलं गेलं असेल तर मी माझं वक्तव्य मागे घेत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.