मुंबई : दुय्यम खाती मिळाली म्हणून नाराज असलेल्या मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्ती करून केली नाराजी दूर केली आहे.
बाळासाहेब थोरात दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हायकमांड यांच्याशी वडेट्टीवार यांच फोनवर बोलणं करून दिलं. त्यानंतर वड्डेट्टीवार यांची नाराजी दूर झाली आहे. शिवसेनेकडे असलेलं मदत आणि पुनर्वसन खातं वड्डेट्टीवार यांना मिळणार आहे. नाराज असलेले वड्डेटीवार मधल्या काळात ऑऊट ऑफ संपर्क होते. याबद्दल त्यांना विचारले असता आपण फॅमिलीसोबत वेळ घालवायला गेलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी 'झी २४ तास'ला दिली. निवडणुकीच्या धावपळीत कुटुंबाकडे लक्ष देता आले नव्हते. त्यामुळे आपण कौटुंबिक आयुष्यात व्यस्त होतो असे ते म्हणाले.
वड्डेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन ही खाती आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. याआधी विरोधी पक्षनेते असल्यामुळे चांगलं खातं मिळेल अशी अपेक्षा वडेट्टीवार यांना होती, पण तुलनेने कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे वडेट्टीवार नाराज होते.