काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे ११ गड ढासळण्याच्या स्थितीत

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी बालेकिल्ला गमवणार?

Updated: Sep 14, 2019, 06:17 PM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे ११ गड ढासळण्याच्या स्थितीत  title=

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते पक्ष सोडून गेल्यानं दोघांचेही अनेक पारंपरिक गड ढासळण्याच्या स्थितीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून शिवसेना-भाजपमध्ये गेलेले हे नेते आता या गडांवर भाजप, शिवसेनेचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळायला सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं, राज्याची विधानसभा निवडणूकही भाजपासाठी सोपी झाली आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले नेते अस्वस्थ झाले आहेत. 

आपण पुन्हा निवडून येणार नाही या भीतीनं आणि पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ताही येणार नसल्यानं, आपल्या अडचणीत असलेल्या सहकारी संस्था वाचवण्यासाठी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत उड्या मारायला सुरुवात केली आहे. हे नेतेच गेल्यानं त्या-त्या जिल्ह्यात काही प्रमाणात शाबूत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गड ढासळलेत. यात सगळ्यात जास्त दणका बसलाय तो राष्ट्रवादीला.  
 
१. सातारा - राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच बालेकिल्ला असेलल्या साताऱ्यानं सगळ्यात जास्त आमदार आतापर्यंत राष्ट्रवादीला दिले. मात्र आधी शिवेंद्रराजे भोसले आणि आता उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाने या गडाला धक्का बसण्याची शक्यता आहे. तर माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना भाजपाने प्रवेश देऊन इथे आपलं कमळ फुलवण्याची तयारी केली आहे.

२. अहमदनगर - नगरमध्ये लोकसभा निवडणुकीआधी राधाकृष्ण विखे पाटील आणि लोकसभा निवडणुकीनंतर मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांना प्रवेश देऊन भाजपने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या गडाला हादरा दिला आहे. तर श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेनं आपल्याकडे घेऊन नगरमध्ये आपलं वर्चस्व वाढवण्याची तयारी सुरू केली आहे.

३. नवी मुंबई - गणेश नाईक राष्ट्रवादीत असल्यापासून नवी मुंबई हा राष्ट्रवादचा मजबूत गड होता. महापालिकेपासून ते विधानसभेपर्यंत नाईकांचं नवी मुंबईवर वर्चस्व होतं. मात्र गणेश नाईक यांच्यासह संदीप आणि संजीव या त्यांच्या दोन्ही मुलांना प्रवेश देऊन भाजपाने या गडावर कब्जा केला आहे.

४. उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि शरद पवारांचे जवळचे सहकारी पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील यांना पक्षात घेऊन भाजपाने उस्मानाबादच्या गढीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

५. कोकण - कोकण एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र कालांतराने शिवसेनेच्या किल्ल्याचे बुरुज ढासळले. हा किल्ला पुन्हा मजबूत करण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीतून इनकमिंग केलं. यात रायगडमध्ये सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी त्यांचा भाऊ अनिल तटकरे आणि पुतण्या अवधूत तटकरे यांना शिवसेनेनं प्रवेश दिला. तर १५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत गेलेल्या रत्नागिरीमधल्या भास्कर जाधवांना स्वगृही घेतलं. हे नेते कोकणात शिवसेनेला जुनं वैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

६. पुणे - जिल्ह्यात हर्षवर्धन पाटील यांना आपल्याकडे घेऊन भाजपने काँग्रेसबरोबरच शरद पवारांनाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

७. बीड - जयदत्त क्षीरसागर यांना प्रवेश देऊन राष्ट्रवादीला धक्का देत तिथं शिवसेना आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे.
शहापूर - राष्ट्रवादीतून पांडुरंग वरोरा यांना प्रवेश देऊन ती जागा खेचून आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे

८. सोलापूर - राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना शिवसेनेनं आपल्या गळाला लावलं आहे. यात बार्शी इथले दिलीप सोपल, तर करमाळ्याच्या रश्मी बागल यांचा समावेश असून सोलापुरात राष्ट्रवादीला हादरा दिला आहे. तर सुशीलकुमार शिंदेंच्या जवळ असलेले दिलीप माने यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपाने काँग्रेसला धक्का दिला आहे. 

९. कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजड महाडिक यांना पक्षात देऊन कोल्हापुरात भाजपा आपली ताकद वाढवू पाहत आहे.

१०. इगतपुरी - मतदारसंघातील निर्मला गावित यांना प्रवेश देऊन शिवसेनेनं या आदिवासी पट्ट्यात आपला शिरकाव करण्याचा मानस ठेवला आहे. 

११. मुंबई - कालिदास कोळंबकर यांना भाजपाने आपल्याकडे घेत नायगाव मुंबईत आणखी एक मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे मुंबईत आधीच कमजोर असलेल्या राष्ट्रवादीला शिवसेनेनं सचिन अहिर यांच्या प्रवेशाने मोठा धक्का दिला आहे.

ज्या मतदारसंघात आपली अजिबात ताकद नाही, तिथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजप, शिवसेनेनं आपल्याकडे खेचल्याचं आतापर्यंत या दोन्ही पक्षात झालेल्या प्रवेशावरून स्पष्ट होतं. त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्यापैकी ताकद असलेल्या भाजपाने पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते फोडून २०१४ च्या निवडणुकीत काही प्रमाणात कोसळलेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडाला पूर्ण शह देण्याची तयारी सुरू केली आहे. यानिमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे कमळ जिथे कधीच पोहचले नव्हते तिथे ते पोहचणार आहे.