महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसची मोठी कमाई; विधानसभा निवडणुकीच्या अर्ज विक्रीतून 40 कोटींचा पक्षनिधी

Maharashtra Politics : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरु असले तरी सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढण्याच्या दृष्टिकोनातून तयारी ठेवली आहे.

वनिता कांबळे | Updated: Aug 14, 2024, 09:55 PM IST
महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसची मोठी कमाई; विधानसभा निवडणुकीच्या अर्ज विक्रीतून 40 कोटींचा पक्षनिधी title=

Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरला तो काँग्रेस... काँग्रेसने 13 जागांवर विजय मिळवला... साहजिकच आता विधानसभेलाही काँग्रेसमधल्या अनेकांच्या महत्त्वाकांक्षा बळावल्या आहेत... त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी भरभरुन अर्ज केले आहेत... 

288 मतदारसंघातून अडीच हजारपेक्षा जास्त अर्ज काँग्रेसकडे प्राप्त झाले आहेत..  उमेदवारी अर्जासोबत खुल्या प्रवर्गासाठी वीस हजार तर महिला आणि आरक्षित प्रवर्गासाठी दहा हजारांचा पक्षनिधी घेण्यात आलाय.. त्यामुळे उमेदवारी अर्जाबरोबर प्रदेश काँग्रेसला जो पक्षनिधी प्राप्त झाला, त्याची रक्कम सुमारे ४० कोटींपर्यंत गेली आहे.

प्रदेश काँग्रेसने जुलैच्या पहिल्या आठवड्यात  विधानसभा इच्छुकांना अर्ज पाठवण्याचे आवाहन केलं होतं. अर्ज करण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत होती. ज्या मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार आहे, तिथे इच्छुक कमी आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातून अधिक संख्येने इच्छुक आहेत. प्रत्येक मतदारसंघात सरासरी 8 ते 10 इच्छुक.  57 राखीव मतदारसंघात इच्छुकांचे प्रमाण अधिक आहे. राखीव मतदारसंघात इच्छुकांचे प्रमाण 15 ते 20 पर्यंत आहे. मुंबईतील 36 मतदारसंघात 200 पेक्षा अधिक इच्छुक आहेत. उमेदवारी अर्जामध्ये उच्चशिक्षित, महिला तरुण इच्छुकांचे यंदा प्रमाण मोठे आहे. काँग्रेसकडे सध्या 45 आमदार, विद्यमान आमदार वगळता 50 ते 60 जागांसाठी इच्छुकांमध्ये चुरस आहे. 

लोकसभा निकालात काँग्रेसने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय.. विधानसभेला काँग्रेस 100 पेक्षा अधिक जागांवर लढण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे.. सध्या काँग्रेसकडे 45 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे इच्छुकांमधून नेमकं कोणाला तिकीट मिळणार यासाठी मोठी चुरस दिसणार आहे.