गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याआधी ही बातमी वाचाच! राज्य सरकारचा मोठा निर्णय

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग फूल झालं आहे. यादरम्यान आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 14, 2024, 08:12 PM IST
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याआधी ही बातमी वाचाच! राज्य सरकारचा मोठा निर्णय title=

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी लगबग सुरु आहे. दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग फुल झालं आहे. यादरम्यान आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यादरम्यान राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी यावर्षीदेखील टोलमाफी करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळीही कोकणवासीयांना टोलचा त्रास सहन करावा लागणार नाही. 

दरम्यान दीपक केसरकर यांनी मुंबईत मंडळाकडून आता फक्त 100 रुपये भाडं आकारले जाईल असं जाहीर केलं आहे. गणपती मंडळांना दिलासा देणारे निर्णय आम्ही घेतले आहेत अशी माहिती त्यांनी बैठकीनंतर दिली. 

वर्षभर कार्यक्रम राबवणाऱ्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या कार्यालयाचं भाडं कमर्शियल दराप्रमाणे घेतलं जातं. ते निवासी दराने घ्यावं अशी मागणी केली होती. कमर्शियल दराने घेतल्यामुळे मोठी  थकबाकी होती. त्याच्यावरील व्याज रद्द करावं आणि भाड्याच्या रकमेत 50 टक्के कपात करण्यात यावी अशी मागणी केली. अग्निशामन दलाचे लाखो रुपये भाडे मंडळला भरावं लागत होतं. ते पूर्णपणे भाडे माफ करण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं. 

मूर्तीकारांच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा झाली. मूर्तीकारांसाठी साहित्य सबसिडी योजना राबवण्यात यावी अशी मागणी दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. लालबागचा राजा किंवा तत्सव मोठ्या मंडळाच्या आजूबाजूचे पार्किंग लॉट गणेशोत्सव काळात मोफत करण्यात येतील असंही ते म्हणाले. पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा केला जाईल यासाठी विशेष इनिशेटिव्ह घेतला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. 

गणेशोत्सव मुंबईच्या लोकल ट्रेन रात्रभर चालू ठेवण्याची सूचना रेल्वे मंत्रालयाला करणार आहोत. गणेशोत्सव काळात स्पीकर लावण्यासाठी चार दिवस सूट देण्यात आली आहे. दुसरा दिवस, पाचवा दिवस, सातवा दिवस आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर लावण्यास परवानगी असेल असंही ते म्हणाले.