अमरावती : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी गुरुकुंज मोझरी येथे अडवला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, इत्यादी मागण्यांसाठी हा ताफा अडवला, यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांच्या गाडीवर चढून दूध आणि भाजीपाला फेकून संताप व्यक्त केला.
अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गुरुवारी दुपारी अमरावती येथे वृक्षारोपणाच्या विभागीय बैठकीसाठी निघाले होते. नागपूरवरून अमरावतीकडे जात असताना त्यांनी मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आश्रमात जावून दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर ते गाडीमध्ये बसत असताना अचानक युवक काँग्रेसचे ५० ते ६० कार्यकर्ते तेथे पोहोचले.
'शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे', अशा घोषणा देत काहींनी आपल्यासोबत आणलेले दूध, कांदे व भाज्या फेकल्या. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. मोझरी येथे जवळपास वीस मिनिटे हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मुनगंटीवार हे अमरावती येथे बैठकीसाठी निघून गेले.