नागपूर : नागपुरात गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दमदार पावासामुळे शहरातील काही खोलगट भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यात मौदा, रामटेक भागात पावसाचा जोर अधिक आहे. मौदा तालुक्यातील तारसा, अरोली या गावात पावसाने मोठं नुकसान केलंय. तारसा गावाजवळून वाहणाऱ्या सांड नदीचं पाणी गावात घुसलंय. तारसा गावात चार फुट पाणी साचलंय. गावाचा संपर्क तुटलाय. अनेक गावात शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरुच आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाची झड कायम आहे. पावसामुळे नांदेड शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. मुख्य मार्गांवर मोठया प्रमाणात पाणी साचलं आहे. साचलेल्या या पाण्यातून नांदेडकरांना मार्ग काढावा लागतो आहे. रस्त्यांसह शहरातील अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. सखल भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली असतांना पालिकेची यंत्रणा मात्र गायब आहे.