कोरेगाव भीमा पुस्तकाचा वाद पेटला, नक्की कारण काय?

 कोरेगाव भीमा लढाईवरील पुस्तकावरून सुरू झालेला वाद दिवसागणिक वाढतच चालला आहे.   

Updated: Jan 20, 2022, 10:04 PM IST
कोरेगाव भीमा पुस्तकाचा वाद पेटला, नक्की कारण काय?  title=

पुणे | कोरेगाव भीमा लढाईवरील पुस्तकावरून सुरू झालेला वाद दिवसागणिक वाढतच चालला आहे. एकीकडं या कथित वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी रिपब्लिकन संघटनांनी केली आहे. तर दुसरीकडं पुस्तक मोफत वाटण्याचा इशारा देत ब्राह्मण महासंघानं देखील या वादात उडी घेतली आहे. (controversy create over to on 1 january 1818 koregaon bhima battle reality book)

कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारी 1818 साली झालेली लढाई पेशव्यांविरुद्ध नव्हती. तर अचानक झालेली ती चकमक होती, असा दावा अॅड. रोहन माळवदकर यांनी आपल्या नव्या पुस्तकात केला आहे. त्यावरून पेटलेली वादाची ठिणगी आता चांगलीच भडकली आहे. 

या पुस्तकातून चुकीचा इतिहास सांगून समाजासमाजात तेढ निर्माण केली जातेय. शिवाय पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तोंडी चुकीची वाक्यं घालण्यात आली आहेत. त्यामुळं पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटानं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. 

एकीकडं दलित संघटना आक्रमक झाल्या असताना, ब्राह्मण महासंघानं देखील वादात उडी घेतली आहे. 

कोरेगाव भीमाची लढाई पेशवा विरुद्ध अन्य कोणता समाज, अशी नव्हती. हिंदवी साम्राज्याचे सैन्य आणि परकीय सैन्य अशी लढाई झाली. नव्या पुस्तकात आमच्या या भूमिकेला पुष्टी देणारे पुरावे मांडण्यात आले आहेत. जर बंदी घातली तर ब्राह्मण महासंघ पुस्तकाचं मोफत वाटप करेल, अशी भूमिका संघटनेनं घेतली आहे.

1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचं वास्तव असं या पुस्तकाचं नाव आहे. पण या लढाईचं नेमकं वास्तव काय, याबाबतचा वाद अजून तरी मिटायला तयार नाही.