...तर राज्यातली दारूची दुकानं सुरू होणार

गेल्या महिनाभर बंद असलेली दारूची दुकानं उघडण्याच्या विचारात राज्य सरकार आहे.

Updated: Apr 21, 2020, 09:50 PM IST
...तर राज्यातली दारूची दुकानं सुरू होणार

मुंबई : गेल्या महिनाभर बंद असलेली दारूची दुकानं उघडण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. पण त्यासाठी सरकारच्या काही अटी आहेत. लॉकडाऊनच्या काळात तळीरामांमध्ये सगळ्यात जास्त अस्वस्थता पाहायला मिळाली. दारूसाठी वाट्टेल ते तळीरामांनी केलं. कोणी दारूची दुकानं फोडली, कोणी एक्साईजचं गोदाम फोडण्याचंही धाडस केलं. काहींनी थेट हातभट्टी शोधली, तर काहींनी सॅनिटायजरही पिऊन पाहिलं.

खरंतर दारुविक्रीतून सरकारला मोठा महसूल मिळतो. कोरोनाशी लढण्यासाठी तिजोरीत पैसा हवा, त्यामुळे सरकार काही अटींवरती दारूची दुकानं उघडी ठेवायचा विचार करत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आलं तर दारूची दुकानं उघडण्यास हरकत नाही, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

दारूची दुकानं सुरु करण्याचा सरकार फक्त विचार करतयं, त्यामुळे तळीरामांनी लगेचच हुरळून जाण्याची काहीच गरज नाही.