लॉकडाऊनचा फटका, वाहन न मिळाल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका आता इतर आजारांच्या रुग्णांनाही बसू लागलाय. 

Updated: Apr 21, 2020, 11:08 PM IST
लॉकडाऊनचा फटका, वाहन न मिळाल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका आता इतर आजारांच्या रुग्णांनाही बसू लागलाय. लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील नांदगाव येथील १३ वर्षीय साक्षी कांबळे थॅलेसेमिया आजाराने त्रस्त होती. मात्र हा आजार बळावल्याने  रुग्णालयात जाण्यासाठी वेळेत वाहन न मिळाल्यामुळे साक्षीला जीव गमवावा लागला.

लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील नांदगाव या छोट्याश्या गावात कांबळे कुटुंब राहतं. १९ एप्रिलरोजी घरातल्या चिमुरडीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या आईच्या डोळ्यातील अश्रू अजूनही आटले नाहीत. साक्षीचे वडिल जीवन कांबळे हे जन्मत:च अपंग आहेत. तर आई संगीता कांबळे या मोलमजुरी करून कुटुंबीयांचा गाडा हाकते. हातावर पोट असलेल्या कांबळे कुटुंबियांची लॉकडाऊनमध्ये खरी अग्नीपरीक्षा सुरू आहे.

कांबळे दाम्पत्याला प्रतीक आणि साक्षी ही दोन मुलं आहेत. प्रतीक नववीमध्ये तर साक्षी सातवीमध्ये होती. दोन्ही लेकरांना थॅलेसेमिया नावाचा दुर्धर आजार असल्यामुळे महिन्यातून किमान दोनदा संपूर्ण रक्त बदलावं लागतं. 

लॉकडाऊनमध्ये एकीकडे हाताला काम नाहीत. त्यात एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत झालेली असताना साक्षीचा आजार बळावला. १९ एप्रिल रोजी दुपारपासून साक्षीला खूप त्रास होऊ लागला. उसनवारीने कांबळे दाम्पत्याने कसे बसे पैसेही जमविले. चारचाकी गाडीची शोधाशोध सुरु झाली. मात्र लॉकडाऊन आणि पोलिसांच्या भीतीमुळे कुणीही यायला तयार नाही.

अखेर गावचे सरपंच मारोती कांबळे हे स्वतःची गाडी घेऊन आले. अख्खे कुटुंब लातूरला निघाले. वाटेत दोन-तीन वेळा पोलिसांनीही गाडी अडवली. इकडे साक्षीला त्रास होत असल्यामुळे ती विव्हळत होती. आणि लातूर शहर अवघ्या ४ किमी. असताना साक्षीने या जगाचा निरोप घेतला.

कोरोनाच्या महामारीत कांबळे कुटुंबाला वेळेत गाडी मिळाली असती, तर १३ वर्षाच्या साक्षीचा जीव वाचू शकला असता. लॉकडाऊन आणि थॅलेसेमिया आजारामुळे आपली मुलगी साक्षीचा असा बळी गेल्यामुळे कांबळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आता मोठा मुलालाही थॅलेसेमिया असल्यामुळे आता त्याचं कसं करायचं?, अशी चिंता कांबळे कुटुंबियाला सतावत आहे. त्यामुळे शासनाने कांबळे कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी सरपंच मारोती कांबळे यांनी केली आहे.