मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात चढ उतार पाहिला मिळतायत. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होती. मात्र आज त्यात किंचीत वाढ झालीय. तसेच कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज (21 जुलै) राज्यात एकूण 8 हजार 159 कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर 7 हजार 839 जण कोरोनामुक्त झालेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. तर आज 165 करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 60,08,750 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत 1,30,918 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के इतका आहे. राज्यात सध्या 94 हजार 745 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 560 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 430 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,020 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1097 दिवसांवर गेला आहे.
धुळे, नंदूरबार या दोन जिह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तर कोल्हापुरात सर्वाधिक 986 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,566 सक्रिय रुग्ण आहेत.