CORONA UPDATE - दिलासादायक! नागपुरात 130 दिवसानंतर मृत्यूचा आकडा ''शून्य''

दुसऱ्या लाटेत कोरोनाचे थैमान पाहिल्यानंतर आज नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. नागपूर शहरात शुन्य

Updated: Jun 18, 2021, 06:26 PM IST
CORONA UPDATE - दिलासादायक! नागपुरात 130 दिवसानंतर मृत्यूचा आकडा ''शून्य'' title=

अमर काणे, झी 24 तास, नागपूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे थैमान पाहिल्यानंतर आज नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. नागपूर शहरात शुन्य मृत्यूची नोंद झाली आहे. तब्बल 130 दिवसांनी शहरात कोरोनचं मृत्यूतांडव आज थांबलं. विशेष म्हणजे नागपूरच्या ग्रामीण भागातही गेल्या पाच दिवसांपासून कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात थैमान

नागपूर जिल्हयात कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं होतं. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचा शहर आणि ग्रामीण भागात जास्त प्रादुर्भाव होता. एकट्या एप्रिल महिन्यात कोरोनने मृत्यूचा आकडा 100 च्या वर गेला होता. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले. 

ऑक्सिजन आणि बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू होती. शहरात गंभीर परिस्थिती होती. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. 17 जून रोजीच्या आकडेवारीनुसार नागपूर शहरातील एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. विशेष म्हणजे तब्बल 130 दिवसानंतर नागपूरकरांना हा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी 7 फेब्रुवारी 2021 रोजी शहरात मृत्यूचा आकडा शून्य नोंदविला गेला होता. 

130 दिवसांनी शून्य मृत्यूची नोंद

आता तब्बल 130 दिवसानंतर म्हणजे गुरुवार 17 जून रोजी शहरात 6760 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 34 रुग्ण पॉझिटिव्ह नोंदविण्यात आले. 94 रुग्ण बरे झाले. यामुळे सद्यस्थितीत शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 955 इतकी आहे. जून महिन्यापासूनच कोरोनाचा प्रकोप कमी झाला. 

नागपुरातील नागरिकांनी दाखविलेला संयम, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेले अथक परिश्रम, जिल्हा प्रशासन, महापालिका पदाधिकारी, प्रशासन यांनी ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी, बेडसंख्या वाढविण्यासाठी घेतलेली मेहनत, महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात मनपा चमूने केलेलं कार्य अशा एकत्रित प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण मिळविणं शक्य झाले.

आयुक्तांचं नागपुरकरांना आवाहन

आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितलं की, नागरिक, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाच्या प्रयत्नाने मृत्युचा आकडा शून्यावर आला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता निर्बंध शिथील करण्यात आले आहे. पण कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे पालन सार्वजनिक ठिकाणी वावरताना करावं, मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन अवश्य करावं, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.