पुण्यामध्ये कोरोना लस घोटाळा; तब्बल 44 हजार 944 लसींचा हिशेबच लागेना

 पुण्यात आता नवा घोटाळा उघडकीस आला आहे

Updated: Mar 16, 2021, 08:07 PM IST
पुण्यामध्ये कोरोना लस घोटाळा; तब्बल 44 हजार 944 लसींचा हिशेबच लागेना title=

पुणे : पुण्यात आता नवा घोटाळा उघडकीस आला आहे. लसीकरण केंद्रांना करण्यात आलेला लस पुरवठा आणि प्रत्यक्षात झालेलं लसीकरण यांचा हिशेबच जुळत नाही. या हलगर्जीपणाला जबाबदार कोण  असा प्रश्न पडू लागलाय.

तब्बल ४४ हजार ९४४ लसी गेल्या कुठं, असा प्रश्न सध्या पुणे जिल्हा प्रशासनाला पडला आहे. गेल्या 16 जानेवारीपासून पुण्यात लसीकरणाला श्रीगणेशा झाला. त्यासाठी 1 लाख 8 हजार 556 लसींचा पुरवठा जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांना करण्यात आला होता. 

जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड मिळून एकूण 208 लसीकरण केंद्रं आहेत. यांतील काही केंद्रांवर लसींचा साठा उपलब्ध असल्याचं शासनाच्या पोर्टलवर दिसत होतं. मात्र प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्या ठिकाणी लसींचा साठा संपल्याचं सांगण्यात येत होतं. यातून लसींचा पुरवठा आणि प्रत्यक्ष लसीकरण यांत घोळ झाल्याचं समोर आलं आहे. 

काही खासगी लसीकरण केंद्रांनी पोर्टल वरील माहिती अद्यावत केली नाही. त्यामुळं हा गोंधळ झाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. 

आरोग्य विभागाकडून झालेली चूक आता दुरुस्त करण्यात आली आहे. लसीकरणात कुठलाच गैरप्रकार झाला नसल्याचा दावा आता जिल्हा प्रशासनाने केला आहे.

पुण्यात आतापर्यंत 90 टक्क्यांपेक्षा जास्त पात्र लाभार्थींना लस देण्यात आलीय. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात पुण्याचा राज्यात दुसरा क्रमांक लागत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 

तर दुसरीकडं लसीकरणाबाबत तक्रारी सुरूच आहेत. यात समन्वय साधण्याची जबाबदारी आता जिल्हा प्रशासनाची आहे..