दार उघड बया! आजपासून मंदिरं खुली; राज्यभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह

ऑनलाइन बुकिंग केलेल्या भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात रांग 

Updated: Oct 7, 2021, 09:38 AM IST
दार उघड बया! आजपासून मंदिरं खुली; राज्यभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोनाचं संकट पाहता काही काळापूर्वी सुरु करण्यात आलेली मंदिरं पुन्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. भाविकांसाठी ही मंदिरं बंद असली तरीही त्यामध्ये पुरोहितांना मात्र पूजाअर्चा करण्याची परवानगी होती. आता मात्र कोरोना काहीसा नियंत्रणात येत असताना प्रशासनानं पुन्हा एकदा राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. 

घटस्थापनेच्या मुहूर्तावर साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचं पीठ असणारं अंबाबाई देवीचं मंदिर देखील आज (गुरुवारी) पहाटे पाच वाजल्यापासून खुलं करण्यात आलंय. पहाटेपासूनच ऑनलाइन बुकिंग केलेल्या भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात रांग लावली आहे. 

भक्तांना मंदिरात सोडत असताना भक्तांमध्ये सोशल डिस्टंसिंग राहावं याची खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक भक्तांचे थर्मल स्कॅनिंग देखील केले जात आहे. तब्बल सव्वा वर्षांनंतर आई जगदंबेचे मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. ज्या भक्तांना ऑनलाईन बुकिंग न करता देवीचे दर्शन घ्यायचा आहे अशा भक्तांना मुखदर्शनाची सोयदेखील करून देण्यात आली आहे. 

नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये लाखो भाविक देशभरातून देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळी मात्र या भक्तांना ऑनलाईन बुकींग केल्याशिवाय देवीचं दर्शन घेता येणार नाही. पण घटस्थापनेच्या मुहूर्तावर आंबाबई देवीचं मंदिर खुले झाल्याने गेल्या वर्षभरापासून सुनं सुनं वाटणारं अंबाबाईचं मंदिर भक्तांनी फुलून गेलं आहे. खरंतर अंबाबाई देवीला ओटी वाहण्याची परंपरा आहे. पण भक्तांना ओटीच्या साहित्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

घटनस्थापनेच्या मुहूर्तावर आज अनेक महिन्यांनी राज्यात मंदिरे खुली झाले आहेत. मुंबईतही अनेक मंदिरं खुली झाली असून, अवघ्या मुंबापुरीचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री सिद्धीविनायक मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार, मुलगा पार्थ पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकाळी सव्वा सहा वाजता दर्शन घेतल्याचं पाहायला मिळालं. 

कार्ल्याची एकविरा देवी, शिर्डी येथील साईमंदिर, पंधरपुरातील विठोबा मंदिर येथेही असंच चित्र पाहता येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्य़ा मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मंदिर प्रशासनाकडून नियंत्रण ठेवलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय भाविकही परिस्थितीचं भान राखून वागताना दिसत आहेत. मंदिरं सुरु होण्याचा आनंद प्रत्य़ेकाच्याच चेहऱ्य़ावर असून, आता हे कोरोनाचं संकट पूर्णपणे टळूदे अशीच प्रार्थना प्रत्येक भक्त करताना दिसत आहे.