मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन घोषित करून गुरूवारी एक महिना झाला. या महिन्याभरात राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन पाळण्यात आला. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. पण आता एक महिन्या अगोदरच २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता आणण्यात आली. यामुळे टोल वसुलीला सुरूवात झाली असून फक्त मालवाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे.
तसेच आता येत्या काळात लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश करण्यात आलाय.
१. मुंबईसह पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेतील बंद असलेली मेट्रो रेल्वेची कामं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
२. तसेच मान्सूनपूर्व कामे करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यांची कामे, नालेसफाईचा समावेश असेल.
३. लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय झाली. यामुळे आता ज्येष्ठ नागरीकांची काळजी घेणारे कर्मचारी व मदतनीसांनाही लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.
४. लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा आणि किराणामालाचे दुकान, दुध, फळे, भाज्या याच गोष्टींना सूट देण्यात आली होती. आता पिठाची गिरणी देखील सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
५. याशिवाय पॅक हाऊस, बियाणे व फलोत्पादनाच्या तपासणी व उपचार सुविधांची आयात निर्यात, शेती व बागायतीशी संबंधित संशोधन संस्था, वृक्ष लागवड व मधमाशी वसाहती, मध व त्यासंबंधीच्या उत्पादनांची राज्याअंतर्गत व आंतरराज्यीय वाहतूक, ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया प्रकल्प, डाल मिल, पंख्यांची दुकाने यांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. यामुळे शेतीची सर्व काम पूर्ववत सुरू होण्यास मदत मिळेल.
६. वन विभागाची कार्यालये, वनीकरण, वृक्षारोपण व त्यासंबंधित कामांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आलं आहे.
७. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसार समुद्रातील जहाजांना आवक-जावक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही कामे करताना शासनाने घोषित केलेले नियम, सामाजिक अंतर व स्वच्छता यांची काळजी घेऊन करणे बंधनकारक असणार आहेत.