आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. एक हजार रुपयांची ही वाढ ऑफलाईन प्रवेशासाठी करण्यात आली आहे. या नव्या दरामुळेमुळे मध्यमवर्गीय पर्यटकांवर मोठा बोजा पडेल अशी नाराजी व्यक्त होतेय. दिवाळी आणि त्यानंतर लगेच येणाऱ्या नाताळ, नवीन वर्ष सुट्यांमुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.
निवांत असलेला वेळ आणि गुलाबी थंडी यामुळे पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघोबा पाहण्यासाठी योजना आखत आहेत. मात्र अचानक ताडोबा प्रशासनाने प्रकल्पाच्या प्रवेश शुल्कात वाढ केली आहे. गाभा क्षेत्रासाठी आता २ हजारांऐवजी ३ हजार तर बफर साठी १ हजार ऐवजी २ हजारांचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क सध्या ऑफलाईन बुकिंग साठी आकारण्यात येणार आहे.
प्रवेश शुल्कासह जिप्सी, गाईड, कॅमेराच्या शुल्कात देखील मोठी वाढ झाली आहे. २०१७-१८ ला पर्यटकांची संख्या १ लाख ७२ हजार होती आणि या वर्षी म्हणजे २०१८-१९ ही संख्या १ लाख ८२ हजार झाली आहे, तर दुसरीकडे २०१७-१८ ला झालेले ६ कोटी ७० लाखांचे उत्पन्न २०१८-१९ मध्ये तब्बल ११ कोटी ५० लाखांच्या घरात गेले आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात NTCA च्या नियमांमुळे वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ताडोबाच्या बफर क्षेत्रात नवनवीन मार्ग खुले करून ताडोबा प्रशासनाने पर्यटकांना वाघ पाहण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले आहे.