सोलापूर : अवघ्या सोळा महिन्याच्या मुलीवर बापाने अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. यात पाशवी प्रकारात बाळाच्या आईनेही आरोपीस सहकार्य केले. या दोन्ही अत्याचारी आई बापाला सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
आरोपींकडून वारंवार या प्रकरणाला वेगळं देण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, हा गुन्हा अतिशय गंभीर आणि क्रूर असल्यामुळे हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून न्यायालयाने योग्य निर्णय दिला. सर्वात महत्वाचं म्हणजे पाच महिन्यांच्या कालावधीतच कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील धोलाराम बिष्णोई आणि त्याची पत्नी पुनीकुमारी बिष्णोई अशी या दोघं आरोपींची नावे आहेत. 3 जानेवारी 2022 रोजी सोळा महिन्याच्या बाळावर अनैसर्गिक अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
सिकंदराबाद येथे करून खून करून राजस्थानमध्ये मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमधून 3 जानेवारी रोजी त्या पती पत्नीला ताब्यात घेतले होते.
मृतदेहाचा वास येऊ नये अथवा कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसच्या एसी डब्यातुन प्रवास सुरु केला. मात्र, सिकंदराबाद पासून बाळ रडत नाही किंवा उठत नाही यामुळे डब्यातील प्रवाशांना संशय आला.
प्रवाशांनी तिकीट निरीक्षकाला याची माहिती दिली. त्यानंतर गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर आली असता पती पत्नीला खाली उतरवून त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी बाळ आजारी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी बाळाचा ताबा घेऊन तपासणी केली असता डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित केले.
बाळाच्या मृतदेहाची मेडिकल टेस्ट केली असता तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत गळा आवळून खून केल्याचे समोर आले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले. त्यांनी केवळ 9 दिवसांत 31 साक्षीदारांची साक्ष या प्रकरणात नोंदवली.