कोरोनामुळे गो-शाळेतील एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट !

  कोरोनामुळे गो-शाळेत झालेल्या एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट.  

Updated: May 6, 2021, 03:35 PM IST
कोरोनामुळे गो-शाळेतील एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट ! title=

शशिकांत पाटील / लातूर : लग्न समारंभ हा आठवणीत राहावा असे प्रत्येकाला वाटते. मात्र कोरोना काळात ते अनेकांना शक्य होत नाही. मात्र त्यातूनही मार्ग काढून लातूरच्या डॉक्टर वर-वधूचा विवाह सोहळा संस्मरणीय ठरलाय. कारण हा विवाह सोहळा पार पडलाय तो चक्क गो-शाळेत.  कोरोनामुळे गो-शाळेत झालेल्या एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट. (Covid-19 : A unique wedding at a cow-school at Latur)

 लातूरच्या गोपाळ झंवर यांची डॉक्टर कन्या भाग्यश्री हिचा विवाह जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील डॉक्टर सचिन चांडक यांच्याशी सहा महिन्यापूर्वी ठरलेला होता. थाटामाटात विवाहाचे स्वप्न कोरोनामुळे दुभंगले. अनेकदा विवाहाच्या तारखाही पुढे ढकलल्या. पण कोरोनाचा कहर थांबत नसल्याचे पाहून शासन नियमात विवाह करण्याचे ठरले. पण मंगल कार्यालय मिळणे ही अवघड होते. मग काय विवाह स्थळ ठरले ते गो-शाळेचे. लातूरच्या गुरु गणेश जैन गो-शाळेत विवाहाची तयारी झाली. मोजके पाहुणे आणि २०० गायीच्या उपस्थितीत डॉ. भाग्यश्री आणि डॉ. सचिन यांचा हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नात पाहुण्यांसाठी मेजवानी तर होतीच पण २०० गायीसाठी पुरणपोळीची मेजवानी ठेवण्यात आली होती. वधू-वरानी स्वतः गायींना आपल्या हाताने पुरणपोळी या गायींना चारली. या सोहळ्यामुळे वधू-वर कुटुंबीय मात्र आनंदी होते.  

 मारवाडी माहेश्वरी समाजात लग्नाचा मोठा थाट असतो. पण कोरोनामुळे हे शक्य नसल्याने कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत, कमी खर्चात झालेला हा गो-शाळेतील विवाह सर्वांसाठीच आदर्श ठरलाय. त्यामुळे येत्या काळातही असे विवाह व्हावेत अशी अपेक्षा विवाहाला उपस्थित  असलेल्या मोजक्या पाहुण्यांपैकी एक असलेल्या भाजप आ. अभिमन्यू पावर यांनी व्यक्त केली आहे. 

  गायी विषयी असणारी आस्था यामुळे अधोरेखित झाली असली तरी विवाह सोहळा गो-शाळेत करण्याची ही घटना आगळी-वेगळीच म्हणावी लागेल.  अत्यल्प खर्चात सामाजिक संदेश देणारा हा झंवर आणि चांडक परिवारासाठी कोरोना काळातही संस्मरणीय ठरला एवढं मात्र निश्चित.