शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर: चाकूरच्या कृषी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये एक वयोवृद्ध प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साठेनगर परिसरातील एका ६५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला गुरुवारी कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांना हलकासा खोकलाही होता तसेच त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होता. रात्री त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड केअर सेंटरच्या डॉक्टरांनी त्यांचे कौन्सलिंगही केले.
देशात कोरोनाचा कहर; २४ तासात ६१,५३७ नव्या रुग्णांची नोंद
मात्र शुक्रवारी धाप लागत असल्यामुळे ते कोविड केअर सेंटरच्या पायऱ्यांवर आले आणि तिथेच जागेवर पडले. यानंतर उपस्थित असलेल्या डॉक्टरांची धावपळ झाली. डॉक्टर पीपीई किट घालून येईपर्यंत रुग्ण घामाघुम झाला होता. त्यानंतर रुग्णाला उचलून नेऊन ऑक्सिजन लावण्यात आला. मात्र थोड्याचवेळात त्या रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेला असावा, अशी शक्यता वैद्यकीय अधीक्षक डॉ.एम.एस. लांडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केली आहे.
मात्र, यामुळे काही सवाल उपस्थित झाले आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये धाप लागत असताना त्या रुग्णावर लक्ष देण्यासाठी कुठलाही डॉक्टर किंवा कर्मचारी त्या ठिकाणी का उपस्थित नव्हते ? रुग्ण रूम मधून पायऱ्यापर्यंत कसा आला ? पायऱ्यावर येऊन रुग्ण पडेपर्यंत कुणाचेच कसे लक्ष गेलं नाही ? जर रुग्णाची प्रकृती इतकी गंभीर होती आणि त्याला खोकला असताना लातूरच्या डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी का पाठविण्यात आले नाही ? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. एकूणच या घटनेमुळे खळबळ उडाली असून कोविड केअर सेंटरवरील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.