मुंबई : महाराष्ट्रात वाढणारी रुग्णसंख्या (Maharashtra corona) आपल्या शेजारच्या राज्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. आणि त्यामुळेच इतर राज्यांसोबतच गुजरातनेही महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध कडक केले आहेत. (Corona test mandatory for traveling from Maharashtra to Gujrat)
तुम्हाला जर आता महाराष्ट्रातून वाहन घेऊन गुजरातला जायचे असेल, तर तुम्हाला कोरोनाची RT-PCR चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुमचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आहे, हे दाखविल्याशिवाय तुम्हाला महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवेश मिळणार नाही.
गुजरात सरकारच्या आरोग्य विभागाने ही नियमावली प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनातील प्रवाशाची तपासणी करा, असे आदेशच गुजरातच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग आणि पोलिसांची पथकंही सीमेवर तैनात केली जाणार आहेत.
महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या वर्षभरातही नव्हती एवढी रेकॉर्डब्रेक संख्या आता महाराष्ट्रात नोंदवली जाऊ लागली आहे. काल महाराष्ट्रात ३६ हजाराहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळले.
गुजरात हे महाराष्ट्रालगतचेच राज्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय-व्यापारासाठी राज्यांतर्गत वाहतूक होत असते. म्हणूनच महाराष्ट्रातील वाढता संसर्ग गुजरातमध्येही पसरू नये, यासाठी आता महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येणार आहे.