नाना पटोले यांनी संजय राऊत यांना पुन्हा आठवण करुन दिली...

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा काँग्रेस हा एक घटक

Updated: Mar 27, 2021, 12:55 PM IST
 नाना पटोले यांनी संजय राऊत यांना पुन्हा आठवण करुन दिली...

अमर काणे, झी २४ तास, नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा काँग्रेस हा एक घटक आणि तो एक महत्त्वाचा घटक आहे, ही मित्र पक्षांना आठवण करुन देण्यासाठी एक दमदार वक्तव्य केलं आहे. आता नाना पटोले यांनी असं वक्तव्य केलं आहे की, "संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते असल्यासारखं बोलतात,  ते शिवसेनेचे खासदार किंवा प्रवक्ते राहिले नसल्यासारखं वक्तव्य करतात, आमच्या नेत्यांविषयी कुणीही बोलणे आम्हाला मान्य नाही, याविषयी मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार आहोत, तसेच महाराष्ट्र विकास आघाडीचा काँग्रेस देखील महत्त्वाचा घटक आहे हे विसरु नका", ही आठवण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना नाना पटोले यांनी करुन दिली आहे.

नाना पटोले यांनी असं वक्तव्य का केलं असावं?

सोनिया गांधी यांची तब्येत आता बरी नसते, तसेच यूपीआयचं नेतृत्व शरद पवार यांनी आता करावं असं यूपीआयतील अनेक घटक पक्षांना वाटतं असं वक्त्तव्य काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्याचा तेव्हा देखील नाना पटोले यांनी समाचार घेतला होता.

आठवण तर करुन दिली

शिवसेना हा यूपीआयचा घटक पक्ष नसल्याची आठवण त्यावेळी, नाना पटोले यांनी संजय राऊत यांना करून दिली होती. आता देखील नाना पटोले यांनी संजय राऊत यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळे पक्ष असल्याची आठवण तर करुन दिली आहे, शिवाय महाविकास आघाडीत काँग्रेस देखील एक महत्त्वाचा घटक असल्याची आठवण करुन दिली आहे.