Barsu Refinery : गेल्या काही दिवसांपासून राजापूर (Rajapur) तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार वाद सुरु झाला आहे. या स्थानिकांसह विरोधक आणि सत्ताधारी या प्रकल्पावरुन आमने सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शनिवारी बारसू येथील आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे बारसूमध्ये जाहीर सभा घेणार होते. मात्र पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही उद्धव ठाकरे यांनी धमकीवजा इशारा दिला होता. यावरुनच आता ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून नाराणय राणे यांच्यासह बारसू प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांविरोधात जोरदार निशाणा साधला आहे.
खोके हाताशी असले की भाडोत्री ताकद दाखवली जाते
"रत्नागिरीतील बारसू-सोलगाव येथेही दडपशाहीचे तेच जंतर मंतर सुरू असून येथेही काटक कोकणी माणूस मागे हटायला तयार नाही. विषारी रिफायनरीविरुद्ध त्यांचा लढा पोलिसी दडपशाही झुगारून सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांना पोलिसांनी बेदम मारहाण केली, तडीपाऱ्या केल्या. जबरदस्तीने जमिनी हिसकावण्याचा प्रयत्नदेखील सुरू आहे, पण तरीही कोकणी माणूस लढतोच आहे. अशा लढाऊ कोकणी माणसाला भेटून त्याची वेदना समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज बारसूला निघाले आहेत. लोकशाहीत पोलीस लोकांची डोकी फोडत असताना उद्धव ठाकरे यांनी तेथे पोहोचू नये, त्यांच्या मार्गात अडथळे आणावेत यासाठी उपऱ्यांचे राजकीय दलाल प्रयत्नशील आहेत. उद्धव ठाकरे बारसूत जात आहेत म्हणून कोकणातील काही आंडूपांडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्यात. कोकणात पाय ठेवून दाखवा, इंगा दाखवतो वगैरे नेहमीच्या वल्गना केल्या. एवढेच नाही तर या विषारी रिफायनरीच्या समर्थनार्थ हे इंगावाले मोठा मोर्चा काढून म्हणे ताकद वगैरे दाखवणार आहेत. खोके हाताशी असले की भाडोत्री ताकद दाखवली जाते. भावी पिढीच्या भविष्यासाठी आणि कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी बारसू प्रकल्प होणे कसे गरजेचे आहे ते सांगण्यासाठी म्हणे हा मोर्चा आहे. कोकणचे व भावी पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी रिफायनरी हवीच, असे हे लोक म्हणत आहेत. हे असे असेल तर मग शेकडो लोक रिफायनरीच्या विरोधात आणि आपल्या जमिनी, मच्छीमारी वाचवण्यासाठी रस्त्यावर का उतरले आहेत?," असा सवाल सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावरुन निशाणा साधला होता. "उद्धव ठाकरे कोकणात आले तर त्यांना पळवून लावू असा इशारा नारायण राणे यांनी दिला होता. दुर्दैवाने बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणावे लागते. बाळासाहेबांच्या नखाची सर या माणसाला नाही. येऊ द्याच कोकणात आम्ही आहोत. बघुयात का होतय ते. आम्ही पण तिथे येतो होऊन जाऊदे एकदाचं. कोकणातून मुंबईत जायला किती किलोमीटर पळायला लागेल. चालायची ताकद नसणाऱ्यांनी पळायचा विचारही करु नये," असे नारायण राणे यांनी म्हटलं होतं.