फोनवर बोलताना तुम्हीसुद्धा ही चूक करत नाही ना? मुंबईकराला 1.48 कोटींचा गंडा; पण...

Group of 7 People Arrested By Mumbai Police: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने अवघ्या 4 दिवसांमध्ये 1 कोटी 48 लाखांहून अधिक रुपयांचा अपहार केला. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 15, 2024, 03:34 PM IST
फोनवर बोलताना तुम्हीसुद्धा ही चूक करत नाही ना? मुंबईकराला 1.48 कोटींचा गंडा; पण... title=
पोलिसांनी 7 आरोपींना केली अटक (डावीकडील फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - रॉयटर्स)

Group of 7 People Arrested By Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभागाच्या सायबर गुन्हे शाखेने कोलकात्यामधील एका सायबर चोरांच्या टोळीला अटक केली आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे जाऊन मुंबई पोलिसांनी 7 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे 50 लाख रुपये कॅश आणि इतर डिजीटल साहित्य सापडलं आहे. या टोळीनं एका मुंबईकराला तब्बल दीड कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असा संपूर्ण टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे. 

1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांचा अपहार

चर्चगेट येथे राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीने सायबर पोलिसांकेड 7 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामध्ये फसवणूक, सायबर कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार 29 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यानच्या काळात तक्रारदाराच्या कुटुंबियांच्या खात्यावरुन तब्बल 1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराबरोबरच त्याच्या कुटुंबियांच्या बँक खात्यातून, डेबीड कार्डमधून आणि क्रेडीट कार्डमधून माहिती मिळवून पैशांचा अपहार केला. तक्रारदार व्यक्तीबरोबरच त्याची पत्नी आणि परदेशात राहणाऱ्या मुलीच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यांमधून पैसे क्रेडीट कार्डद्वारे फ्लिपकार्ट, कार्डलेन, मंत्रा, स्वीगी सारख्या ऑनलाइन माध्यमांवरुन खर्च करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवर तब्बल 1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांची खरेदी 4 दिवसांमध्ये करण्यात आली. क्रेडीट कार्डवरुन महागड्या वस्तू मागवण्यात आल्या होत्या. या वस्तू कोलकात्यामधील वेगवेगळ्या ठिकाणावर डिलेव्हर करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलिसांची एक तुकडी तपासासाठी कोलकात्याला रवाना झाली. 

चोराची इंग्रजी ऐकून व्हाल थक्क...

मुंबई पोलीस शहरात आल्याचं समजल्यानंतर आरोपी सिलीगुडीमध्ये पळून गेले. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतलं. चौकशीनंतर या 7 जणांना अटक करण्यात आलं. 7 जणांना अटक करुन सीलीगुडी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता त्यांना 16 मार्चपर्यंत ट्रांझीट रिमांड देण्यात आली आहे. आरोपी कोलकात्यामध्ये कॉल सेंटर चालवत असल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपी भारतीय आणि परदेशी लोकांना क्रेडीट कार्डच्या सिक्युरीटीसंदर्भातील सेवा देण्याची ऑफर करत कॉल करुन त्यांच्या क्रेडीट कार्डची माहिती मिळवायचे. या माहितीच्या आधारे ते ऑनलाइन शॉपिंग करायचे. या व्यक्तीला 1.48 कोटींचा गंडा घालण्यात आला होता पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. अगदी परदेशी कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे ब्रिटीश अॅक्सेंटमध्ये फोनवर हे कर्मचारी बोलत असल्याने कॉल पदेशातून आल्यासारखं वाटायचं. या टोळीतील चोराची इंग्रजी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

50 लाख कॅश, 27 मोबाईल फोन्स, 5 घड्याळं अन्...

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रयान शाहदास (22), अरुणभा हल्डर (22), रितम मंडल (23), तमोजीत सरकार (22), रजिब शेख (24), सुजोय नासकर (23) आणि रोहीत बैदय (23) यांचा समावेश आहे. हे सर्वजण कोलकात्याचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 50 लाख रुपये रोख रक्कम, 27 मोबाईल फोन्स, 5 महागडी घड्याळं, 3 एअर बड्स, 1 मॅकबूक, 1 आयपॅड, 11 परफ्युम बॉटल्स, 2 लेडीज बॅग, 2 फ्रिज, 2 एअर कंडिशनर, 2 प्रिंटर आणि 1 किचन चिमणी जप्त करण्यात आली आहे. 

पोलिसांनी केलं आवाहन

डल्ला मारलेल्या 1 कोटी 48 लाखांपैकी 60 लाखांच्या सामानची ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून डिलेव्हरी करण्यात आली होती. इतर मालाची डिलेव्ही पोलिसांनी तात्काळ थांबवली. पोलिसांनी अशाप्रकारे अज्ञातांना फोनवरुन आपला बँकिंगसंदर्भातील तपशील देऊ नये असं आवाहन केलं आहे.