Question To Sayaji Shinde About Chhagan Bhujbal Win: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार छगन भुजबळ हे सध्या चर्चेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भुजबळांना स्थान देण्यात न आल्याने ते नाराज असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळामध्ये चांगल्याच चर्चेत होता. मात्र आता छगन भुजबळांच्या विजयावरुन निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेंनाच एका चाहत्याने जाब विचारल्याचं नुकतच इन्स्टाग्रामवर पाहायला मिळालं.
सयाजी शिंदेंनी आपल्या एका जिवलग मित्राबरोबरचं एक खास रिल शेअर केलं. "पैसा नकोय प्रेम पाहिजे, लाखो येतील लाखो जातील, मैत्री टिकून राहिली पाहिजे" अशा कॅप्शनसहीत रिल शेअर केलं आहे. यामध्ये सयाजी शिंदेंनी त्यांच्या मित्राबरोबर शेअर केलेल्या व्हिडीओ दोघेही अगदी शेतात नांगरणी करताना, विमान प्रवास करताना, स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओला 6 लाख 28 हजारांहून अधिक लाईक्स आहेत. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीत पडला असून चाहत्यांनी असा एकतरी मित्र आयुष्यात हवा असं म्हटलं आहे.
मात्र सयाजी शिंदेंच्या या रिलवर एका चाहत्याने त्यांना विधानसभा निकालाची आठवण करुन दिली. अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या विजयाचा संदर्भ देत या चाहत्याने सयाजी शिंदेंना थेट प्रश्न विचारला. "साहेब, येवल्यात छगन भुजबळ निवडून आलेत. तुमच्या वचनानुसार 27000 च्या मतांनी निवडून आल्याप्रमाणे तुम्ही 27000 झाडे लागवड करणार होता. राजकारण्यांप्रमाणे तुम्ही पण तुमचे आश्वासन विसरलात का?" असा सवाल शुभम घाटकर नावाच्या चाहत्याने सयाजी शिंदेंना विचारला.
सामान्यपणे सेलिब्रिटी अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. मात्र कायमच आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असणाऱ्या सयाजी शिंदेंनी या कमेंटवर रिप्लाय केला असून हा रिप्लाय त्यांच्या सामाजिक कामासारखाच फार वेगळा आहे. "मी माझं वचन विसरलो नाही. झाडे लाडवडसाठी जुलै महिना पोषक असतो. असं कधी पण लागवड करून चालत नाही. तुमचे सुद्धा सहकार्य मिळेल हीच अपेक्षा," असं सयाजी शिंदेंनी म्हटलं आहे. सयाजी शिंदेंच्या या कमेंटला 2700 हून अधिक लाईक्स आहेत.
सयाजी शिंदे हे वृक्ष लागवडीच्या कामासाठी ओळखले जातात. दरवर्षी ते लाखोंच्या संख्येनं झाडांची लागवड करतात. विशेष म्हणजे केवळ झाडं लावून ते थांबत नाहीत तर या झाडांची वाढ योग्य पद्धतीने होतेय की नाही याची काळजीही ते घेतात. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांचं सर्वच स्तरांमधून कौतुक होताना दिसतं.