'निसर्ग' धोका : शेकडो बोटी मासेमारीसाठी समुद्रात, रत्नागिरी-रायगडमध्ये सतर्कता

पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला निसर्ग वादळाचा धोका आहे.  

Updated: Jun 2, 2020, 10:59 AM IST
'निसर्ग' धोका : शेकडो बोटी मासेमारीसाठी समुद्रात, रत्नागिरी-रायगडमध्ये सतर्कता title=
संग्रहित छाया

रत्नागिरी / रायगड : पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला निसर्ग वादळाचा धोका आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले आहे. कोणीही मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या इशाराकडे दुर्लक्ष आणि सूचनांना हरताळ फासण्यात आला असून शेकडो बोटी मासेमारिकरता अद्यापही समुद्रातच आहेत. त्या अद्यापही सूचना देऊनही माघारी परतलेल्या नाहीत. तर दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज आहे. एन.डी.आर.एफ.च्या दोन तुकड्या रायगडात दाखल झाल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर केंद्रबिंदू असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून या भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्याता आले आहे. तरीही रत्नागिरीतील शेकडो मासेमारी बोटी समुद्रात आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बोटींना माघारी फिरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, मच्छिमारी बोटीकडून मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका कायम  आहे.

रायगडात जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवस संचारबंदी लागू राहणार असून ३ जून रोजी जनता कर्फ्यू घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. समुद्रकिनार पट्टी लगतच्या लोकवस्तीना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सागरी सुरक्षा रक्षकांसह तटरक्षक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रिव्हर राफक्टिंग टीमला देखील सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रसंगी स्थलांतर करण्याकरिता करणार सरकारी ईमारतींचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे.
 
दरम्यान, कोकणसह मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून या भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड अलर्ट भागात अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्ट भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढच्या १२ तासात पूर्वपश्चिम आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल.त्यानंतरच्या २४ तासात पूर्वोत्तर अरबी समुद्रावर त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ सुरुवातीला २ जूनला पहाटे उत्तरेकडे आणि नंतर उत्तर इशान्येकडे वळेल, असे सांगण्यात आले आहे.