Daund ZP School Teacher Suicide: कोणत्याही व्यक्तीला घडवणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. एकीकडे दिवसोंदिवस शिक्षकी पेशाबद्दल नकोश्या बातम्या समोर येत असतानाच काही घटना खरोखरच आजही शिक्षक अत्यंत तळमळीने काम करत असतात. आपलं सर्वकाही झोकून देऊन विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक तसे दुर्मिळच. पण असाच काहीसा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यामध्ये घडला आहे. सर्व विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने एका शिक्षकाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार दौंड तालुक्यामधील जावजीबुवाचीवाडी येथे घडला आहे. जावजीबुवाचीवाडी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षख अरविंद देवकरांनी विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जाणं इतकं मानावर घेतलं ती त्यांनी स्वत:लाच संपवलं. सर्वच्या सर्व विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने अरविंद यांनी तणनाशक पिऊन आत्महत्या केली. अगदी 2 महिन्यांपूर्वीच अरविंद यांची या शाळेत बदली झाली होती.
गावातील छोट्याश्या शाळेची दुरावस्था पाहून अरविंद यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेत त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदान आणि इतर गोष्टींचंही महत्त्व या माध्यमातून मुलांना पटवून देण्याचा अऱविंद यांचा हेतू होता. मात्र अरविंद यांचा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना पटला नाही. त्यांनी शाळेत येऊन गोंधळ घातला आणि मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवलं. शाळेतील सर्व 10 विद्यार्था शाळा सोडून गेल्याने अरविंद देवकर यांचं मानसिक खच्चिकरण झालं. चांगलं काहीतरी करण्याच्या हेतूने केलेल्या कृतीमुळे सर्वच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने त्यांनी तणनाशक औषधाचं सेवन करुन आत्महत्या केली.
अरविंद यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठीही समोर आली आहे. पूर्वीच्या कार्यकाळामध्ये आपल्याला चांगले सहकारी लाभले होते असा उल्लेख या चिठ्ठीत आहे. आत्महत्येपूर्वी अरविंद यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख त्यांनी सविस्तरपणे केला आहे. आपली नियुक्ती मे महिन्यामध्ये झाली होती. त्यानंतर नेमकं काय काय घडलं आणि शाळेतील विद्यार्थ्यांकडून आपण काम करुन घेतल्याने पालक नाराज झाले यासंदर्भातील तपशीलही अरविंद यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. 'माझे मनोगत' या मथळ्यासहीत ही चिठ्ठी अऱविंद यांनी 3 ऑगस्ट रोजी लिहिल्याचं चिठ्ठीवरील तारखेवरुन स्पष्ट होतं आहे.
अरविंद यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणामध्ये पोलीस तपास करत असून नेमकं काय काय घडलं याचा शोध घेतला जात असून या घटनेमुळे पंचक्रोषीत हळहळ व्यक्त केली जात आहे.