लॉकडाऊनमुळे मृतदेह बाईकवरुन नेण्याची वेळ

घरी जाण्यासाठी वाहनं उपलब्ध नसल्याने मृतदेह बाईकवरुनच घरी नेण्याचा आला.

Updated: Mar 28, 2020, 12:18 PM IST
लॉकडाऊनमुळे मृतदेह बाईकवरुन नेण्याची वेळ
संग्रहित फोटो

पालघर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे, विमान वाहतूक ठप्प आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर खासगी वाहतूकीवर बंदी आहे. मात्र रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने पालघरमध्ये रुग्णालयातून एका व्यक्तीचा मृतदेह बाईकवरुन घरी नेण्यात आल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील चिंचारे गावात ही धक्कादायक घडली आहे.

पालघर जिल्ह्यातील चिंचोरे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला सर्पदंश झाला होता. उपचारासाठी त्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार झाल्याचं सांगत त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं, डिस्चार्ज दिला. मात्र डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयातून घरी नेताना, रस्त्यात बाईकवरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

घरी जाण्यासाठी वाहनं उपलब्ध नसल्याने त्यांचा मृतदेह बाईकवरुनच घरी नेण्याचा निर्णय त्यांच्या मुलांनी घेतला. रुग्णालयातून घरी जाताना मृत्यू झाल्याने, डॉक्टरांकडून योग्य उपचार केले गेले नसल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. डॉक्टरांनी मात्र योग्य ते उपचार केल्याचं सांगितलं आहे. 

दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेकांचे अशाप्रकारे हाल होत असल्याचं चित्र आहे. रोजंदारीवर काम करत असलेल्यांना मजूरांवर काम बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अनेक मजूर एका शहरातून दुसरीकडे स्थलांतर करत असताना दिसतायेत. सरकारकडून या सर्वांसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. सामाजिक कार्य करणाऱ्या अनेकांकडून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे अशी परिस्थिती असली तरी, लॉकडाऊन देशातील संपूर्ण जनतेसाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे.