कोरोनापासून वाचण्यासाठी निघाली पायी गावी, महिलेला रस्त्यातच मृत्यूने गाठले

कोरोना बाबतच्या वेगवेगळ्या हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील माणगावमध्ये घडली आहे.  

Updated: May 7, 2020, 09:48 AM IST
कोरोनापासून वाचण्यासाठी निघाली पायी गावी, महिलेला रस्त्यातच मृत्यूने गाठले title=

रायगड : कोरोना बाबतच्या वेगवेगळ्या हृदयद्रावक घटना समोर येत आहेत.  अशीच एक हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील माणगावमध्ये घडली आहे. कोरोनाच्या भीती गावी चालत निघालेल्या महिलेचा मृत्यू  झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईतील नालासोपारा येथून गावी कुटुंबासह ही महिला निघाली होती. ही महिला श्रीवर्धन तालुक्यातील मारळ गावातील रहिवासी आहे. माणगाव जवळ मोरबा येथील बुधवारी संध्याकाळची ही घटना आहे. 

गावी चालत निघालेल्या महिलेने रस्त्यातच प्राण सोडल्याने कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत महिलेचे नाव सलोनी बादरे आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मुंबईहून गावाकडे निघालेली ही महिला गावा शेजारी पोहोचली होती. थोडसे अंतर पार केल्यानंतर ती गावात पोहोचणार होती. मात्र, त्याआधीच तिच्यावर काळाने घाला घातला. या महिलेचा गावाशेजारीच मृत्यू झाला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

 मुंबई कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अनेकांनी कोरोनाची मोठी धास्ती घेतली आहे. नालासोपारा येथून श्रीवर्धनला पायी निघालेल्या बादरे कुटुबावर दु:खाचा प्रसंग ओढवला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मुंबईहून गावाकडे पायपीट करीत बादरे कुटुंब निघाले. यात २१ वर्षीय सलोनी बादरेही होती. ती चालत होती. यावेळी ती अचानक रस्त्यावर कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बादरे कुटुंबाने मोठे अंतर कापले होते. केवळ ३० किमी अंतर गावी पोहोण्यासाठी बाकी होते. त्याचवेळी बादरे कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला.  
 
मुंबई येथे घराबाहेर पडता येत नाही. काम उत्पन्न बंद आणि कोरोनामुळे मृत्यूची भीती यामुळे अनेक जण गावाकडे निघाले आहेत.  अशावेळी नालासोपारा येथील देवेंद्र बादरे हे पत्नी आणि दोन लहान मुलांना घेऊन पायी श्रीवर्धन येथील मारळ या आपल्या गावी निघाले होते.  श्रीवर्धनपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर माणगाव येथे त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला.  देवेंद्र यांची पत्नी सलोनी ही रस्त्याने चालत असताना अचानक खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. कोरोनाचे संकट आपल्यावर येऊ नये, म्हणून हे कुटुंब गावी परत होते. परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.