बारामतीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला 

Updated: Jan 27, 2021, 09:37 AM IST
बारामतीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू

बारामती : तालुक्यातील पिंपळी गावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. दगड खाणी मध्ये साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बारामतीत घडली आहे. सम्राट संतोष शिंदे वय ८ वर्षे व देवा तानाजी शिंदे( वय ९,वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघा मुलांची नावे आहेत. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. 

प्रजासत्ताक दिनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुलांचे आई-वडील मोलमजुरी करतात.  कामासाठी ते मंगळवारी बाहेर गेले होते घरी असणारी मुले दुपारी घरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या दगडखाणीत पोहोण्यासाठी गेले होते . खोल पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही त्यावरून ते बुडून मृत्यू पावले. 

सायंकाळी घरी आलेल्या आई-वडिलांना मुले दिसत नसल्याने त्यांनी शोधाशोध केली असता खाण्यातील पाण्यात दोघांचे मृतदेह आढळले. दरम्यान बारामती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मुलांची मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामती शहरातील सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालयात घेऊन देण्यात आले आहेत. बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे.