पिंपरी चिंचवडचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी; शहरभर बॅनरबाजी

पिंपरी चिंचवडचं नाव बदलून जिजाऊनगर करा. भक्ती शक्ती प्रतिष्ठानने शहरात फ्लेक्स लावून ही मागणी केली आहे.

वनिता कांबळे | Updated: Jun 5, 2023, 11:54 PM IST
पिंपरी चिंचवडचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी; शहरभर बॅनरबाजी title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा केली. संभाजीनगर, धाराशिवपाठोपाठ अहमदनगरचं नामांतर होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवडचे देखील नामांतर होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या नामांतराच्या मागणीचे पिंपरी चिंचवड शहरात बॅनर लागले आहेत ( Pimpri Chinchwad Rename). 

भक्ती शक्ती प्रतिष्ठानने केली पिंपरी चिंचवडचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी

राज्यातील विविध शहरांची नावे बदलण्यावरून मोठा राजकीय वाद वाद होत आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवड शहराचे नावही बदलण्याची मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानच्या महेश बारणे यांनी केली आहे. शहराच्या विविध भागात बॅनरबाजी करत बारणे यांनी ही मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत बारणे यांनी ही मागणी केली आहे. शहरात जवळपास 100 हून अधिक ठिकाणी पिंपरी चिंचवडचा जिजाऊ नगर हे नाव करण्याची मागणी करणारे बॅनर  लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. 

नामांतरामागे भाजपचं हिंदुत्वाचं राजकारण 

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि त्याच ओळीत नगरचं नामांतर हे एक प्रकारे भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा अविष्कार आहे. त्यामुळे एकीकडे आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा बळकट करून घेतानाच, भाजपनं धनगर समाजातही संदेश दिला आहे. आणि म्हणूनच गेल्या चार दशकांपासून भाजपचा महाराष्ट्रात सुरू असलेला 'माधव' प्रयोग आता नवं वळण घेताना दिसत आहे.

माळी, धनगर, वंजारी आणि तत्सम ओबीसी समूहांना जोडण्याचं भाजपचं अभियान

मा..ध..व...अर्थात माळी, धनगर, वंजारी आणि तत्सम ओबीसी समूहांना जोडण्याचं भाजपचं अभियान. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे मार्गदर्शक राहिलेल्या वसंतराव भागवतांकडे या कल्पनेचे जनकत्व जाते.  महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरही प्रामुख्याने मराठा केंद्री राजकारण झाले. या समाजातून आलेले अनेक नेतेही नेतृत्व म्हणून त्यांना लाभले. अशात आधी जनसंघ आणि नंतर भाजपची स्पेस वाढणं अवघड होतं. यातूनच उदय झाला या माधव समीकरणाचा. मराठा समाजाहून अधिक लोकसंख्या असलेला, हिंदू बहुल आणि स्वत:च्या राजकीय स्पेसच्या, नेतृत्वाच्या शोधात असलेला हा होता ओबीसी समाज. त्यातही पुढारलेल्या आणि संख्येनं शक्तिशाली असलेले माळी, धनगर, वंजारी हे या ओबीसी वर्गाचे प्रमुख प्रतिनिधी. म्हणूनच, 70 ते 90 च्या दशकादरम्यान संघ-भाजपातून गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे, माधवराव शिवणकर, भिकूजी इदाते ते आता सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांच्यापर्यंत अनेक ओबीसी नेते पुढे आले. 

मात्र, गेल्या दोन वर्षात राजकीय संदर्भ बदलतायत. शरद पवारांनी 2019 ला विधानसभेत मिळवलेलं यश, शिवसेना फुटल्यानंतर आता उद्धव यांना मिळू लागलेली सहानुभूती, कर्नाटक विजयानंतर काँग्रेसचा वाढलेला आत्मविश्वास, खडसेंनी भाजप सोडणं, पंकजांची वेळोवेळी जाहीर होणारी नाराजी आणि भाजपातही तयार झालेले  प्रस्थापित यामुळे भाजपलाही नवं नॅरेटिव्ह देण्याची गरज होतीच. त्यामुळे अहमदनगरच्या नामांतराच्या निमित्तानं भाजपनं पुन्हा माधवची मोट बांधण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय.