देशमुख कुटुंब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त

लातूरमधील निवडणूक बनली प्रतिष्ठेची...

Updated: Oct 19, 2019, 03:12 PM IST
देशमुख कुटुंब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त title=

लातूर : जिल्ह्यातील राजकारणांचा राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा आजही आहे. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे दोन सुपुत्र अमित आणि धीरज हे लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमधून काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सगळे देशमुख कुटुंब लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रचारात रंगलं होतं. एकूणच लातूर जिल्ह्यातील देशमुख, निलंगेकर, चाकूरकर, पाटील या राजकीय कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आप-आपल्या परीने प्रचारात भाग घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

दिवंगत विलासराव देशमुख यांची 2 मुलं निवडणुकीच्या रिंगणात असल्याने दोघांचाही विजय हा प्रतिष्ठेचा बनला आहे. अर्ज दाखल करताना देखील संपूर्ण देशमुख परिवार उपस्थित होतं. विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख, आदिती अमित देशमुख, जेनिलिया रितेश देशमुख, दीपशिखा धीरज देशमुख यावेळी मंचावर उपस्थित होते.

लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख विधानसभेचं प्रतिनिधीत्व करत आहेत. तिसऱ्यांदा ते विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या अमित देशमुखांना भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटींनी दुसऱ्यांदा आव्हान दिलं आहे. तर वंचित आघाडीच्या राजा मणियार यांचेही नवं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. भाजप सरकारने उजनीचं पाणी मिळवू न दिल्यानं लातूरला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. हाच कळीचा मुद्दा भाजपच्या पथ्यावर येईल असा दावा अमित देशमुखांनी केला आहे.

विलासराव देशमुखांच्या निधनानंतर लातूर जिल्हा पूर्णपणे भाजपमय झाला आहे. लातूर महानगरपालिका, जिल्हा परिषद सारख्या संस्थांवर भाजपचा कब्जा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेतही लातूर शहरातून भाजपला मतदाधिक्य आहे. त्यामुळे विकासाच्या रणनीतीवर आपण वरचढ ठरू असा विश्वास लोहोटींना वाटतो आहे. तर काँग्रेस आणि भाजपने उजनीच्या पाण्यावरून फसविल्याचा आरोपही मणियार यांनी केला आहे.

लातूर शहर मतदारसंघात मुस्लीम, दलित, लिंगायत आणि त्याखालोखाल मराठा मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काचा मुस्लीम-दलित हा काँग्रेसकडेच राहतो की भाजप-वंचित आघाडी त्यात छेद करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.