माधव चंदनकर, गोंदिया : गावातले चार मित्र एकत्र येतात. एक निश्चय करतात.... माझं गाव सुंदर झालं पाहिजे, माझ्या गावात सुख आलं पाहिजे. या छोट्या इच्छेतून अख्ख्या गावाचं रुपडं पालटतं. पाहुया कुठे घडलाय हा चमत्कार.
ही सत्य सुंदर मंगलाची आराधना गोंदियायतल्या पवन तलावाकाठची. काही दिवसांपूर्वी अत्यंत बकाल झालेला हा परिसर. पण त्याचं रुपडं बदलायचंच, असा निश्चय इथल्या रहिवाशांनी केला. आणि पाहता पाहता हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक काठ्या मदतीला आल्या.
गोंदिया हा खरं तर तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.... जिल्ह्याचे वैभव म्हणून मिरवण्याऐवजी इथले बहुतांश तलाव हलाखीच्याच परिस्थितीत आहेत. त्यातच तलवांचा जिल्हा असला तरी पाणीटंचाईचा शाप. मग हे चित्र बदलण्यासाठी गोंदियामधल्या गोरेगावच्या तरुणांनी पुढाकार घेतला. दर रविवारी तरुणांचं श्रमदान सुरू झालं... गावच्या सगळ्या घरांमधल्या गृहिणीही त्यांची घरची कामं आवरुन सावरून गावासाठी आणि तलावासाठी पदर खोचून कामाला लागल्या.
छोट्या दोस्तांनी खारीचा वाटा उचलला. या सगळ्या कार्यासाठी युवाशक्ती फाऊण्डेशनची निर्मिती करण्यात आली. आणि कुदळ, फावडं हातात घेऊन पोरं कामाला लागली. तलावातला गाळ उपसला. त्यामुळे तलाव आणखी पाझरते झाले. सहाजिकच पाणी पातळी वाढली. कमळं फुलती झाली. गावालाही भरपूर पाणी मिळायला लागलं.
मग हाती घेण्यात आलं तलावांचं सुशोभीकरण. तलावकाठाला चौपाटी करण्याचा निश्चय झाला. तलावाकाठी झा़डं लावली चार सुखदुःखाचे क्षण शेअर करण्यासाठी बाकं लागली. अगदी ऊन्हात चालणा-या पांथस्थाला क्षणभर विश्रांतीचीही सोय झाली. प्रत्येक बाकावर गवताचं छप्परही आलं.बालगोपाळांसाठी बागेत खेळणी लागली आणि पाहता पाहता पवन तलावाच्या काठी अगदी गोकूळ नांदू लागलं.
सारस किंवा क्रौंच पक्ष्यांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे..... सारस पक्षी सुरक्षित ठेवण्याचं आव्हान गोंदियासमोर आहेच.... पण सारसबरोबरच अनेक पक्ष्यांचा गोंदियात मुक्काम असतो.... थंडीची चाहूल लागली की देशा परदेशातले पक्षी गोंदियात हवापालटासाठी येतात..... एकंदरीतच पर्यावरणाची हानी पाहता, गेले काही वर्षं या पक्ष्यांची संख्या कमी होत होती..... पण आता पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठीही इथल्या तरुणांनी विशेष प्रयत्न हाती घेतलेत... झाडांवर पक्ष्यांची कृत्रिम घरटी बसवण्यात आलीयत.
विशेष म्हणजे फक्त गावापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता, हे तरुण आणखी पाच तलाव दत्तक घेणार आहेत, आणि त्यांचाही विकास करणार आहेत.... माझं गाव सुंदर व्हावं, ही प्रेरणा या गावात रुजली. त्यातूनच गावचं आणि तलावाचं हे देखणं रुप साकारलं. कुठले तरी निधी आणि शासनदरबारची कुठली तरी आश्वासनं यावर अवलंबून न राहताही कसा चमत्कार घडू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण. गोंदिया हा जवळपास तीस तलावांनी समृद्ध असा जिल्हा आहे. एक पवन तलाव बदलू शकतो तर असे सगळे तलावही बदलू शकतात... आणि त्यातूनच पर्यटनाच्या दृष्टीनंही हा जिल्हा आणखी समृद्ध होऊ शकतो. गरज आहे ते फक्त मनात आणण्याची.