'शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसीमधील भांडणांसाठी फडणवीसांना डॉक्टरेट, सरकारमधले डॉक्टर...'; ठाकरेंचे फटकारे

Uddhav Thackeray Group Slams Devendra Fadnavis Doctorate: देवेंद्र फडणवीस यांनी समाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत डॉक्टरेट पदवी देण्यात आल्याचं विद्यापिठाने जाहीर केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 27, 2023, 07:20 AM IST
'शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसीमधील भांडणांसाठी फडणवीसांना डॉक्टरेट, सरकारमधले डॉक्टर...'; ठाकरेंचे फटकारे title=
ठाकरे गटाने फडणवीसांवर साधला निशाणा

Uddhav Thackeray Group Slams Devendra Fadnavis Doctorate: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी मुंबई विद्यापिठातील दीक्षांत समारंभामध्ये मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. जपानमधील कोयासन विद्यापीठाने ही मानद डॉक्टरेट पदवी फडणवीस यांना दिली. कोयासन विद्यापीठाचे प्राध्यापक इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागने संचालक यामाशिता योशियो यांच्याबरोबरच जपाने मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुकाता, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थिती हा सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी समाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांमध्ये प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. मात्र या पदवी प्रदान सोहळ्यावरुन उद्धव ठाकरे गटाने फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाने मांडली शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी

उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरु असताना फडणवीस यांना सामाजिक समानतेसाठी डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे, असा शाब्दिक चिमटा काढला आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरुन ठाकरे गट आणि भाजपादरम्यान सुरु असलेल्या शाब्दिक वादाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट करताना फडणवीस यांना मिळालेल्या या डॉक्टरेट पदवीवरुन निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आल्याचं कोयासन विद्यापीठाने म्हटलं आहे. असं असतानाच ठाकरे गटाने थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी सादर करत फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

समतेचे व पुरोगामी विचाराचे वाभाडे निघाले

"राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्याही अश्रूंनी भिजल्या आहेत. एका यवतमाळ जिल्ह्यातच 48 तासांत 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पश्चिम विदर्भात वर्षभरात सव्वा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे निर्घृण राज्य करणारे लोक श्रीराम मंदिर सोहळ्याच्या राजकीय घंटानाद करीत फिरत आहेत. महाराष्ट्रात शेतकरी, बेरोजगार रोज आत्महत्या करीत आहेत व बहुदा या महान कामगिरीबद्दलच उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना ‘डॉक्टरेट’ उपाधी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जपानमधील एका विद्यापीठाने सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ही ‘डॉक्टरेट’ दिल्याचे समजते. राज्यात सामाजिक समतेचे व पुरोगामी विचाराचे वाभाडे निघाले आहेत. सध्या मराठा, ओबीसी व इतर समाजातील भांडणे विकोपाला जाऊन परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामागे कोणाचे डोके व खोके आहेत ते महाराष्ट्र जाणतो," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

मैदान सोडून पळून गेले ते रणछोडदास आता...

"आता देवेंद्र फडणवीस यांच्यामागे ‘डॉ.’ अशी उपाधी लागेल. मुख्यमंत्री मिंधे यांनाही मधल्या काळात कुणा संस्थेने सामाजिक कार्याबद्दल ‘डॉ.’ पदवी दिली. पण विद्यमान सरकारच्या काळात महाराष्ट्रात तीन हजारांवर शेतकऱ्यांच्या नावापुढे ‘कै.’, ‘स्व.’ अशा उपाध्या लागल्या. त्यांची घरेदारे उजाड झाली. कुटुंबे अनाथ व पोरकी झाली. त्यावर सरकारमधले ‘डॉ.’ बोलत नाहीत. विदर्भात शेतकऱ्यांच्या आयुष्याचे स्मशान झाले व तिकडे कश्मीर खोऱ्यात जवानांच्या चिता पेटल्या आहेत, पण इकडे डॉ. फडणवीस वगैरे लोक पिचक्या मांडीवर थाप मारून सांगत आहेत, ‘राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान काय? हिंमत असेल तर अयोध्येत या, तुमच्या छाताडावर मंदिर उभे केले आहे.’ राम म्हणजे संयम. राम म्हणजे सुस्वभाव, पण या लोकांनी संयमाची ऐशीतैशीच करून टाकली. जे लोक अयोध्येचा लढा सुरू असताना, शिवसैनिक बाबरीवर निर्णायक घाव घालत असताना मैदान सोडून पळून गेले ते रणछोडदास आता ‘हिंमत दाखवा’ वगैरे आव आणतात तेव्हा आश्चर्य वाटते," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.