Weather Updates : नव्या वर्षाची चाहूल लागलेली असतानाच आता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण सरसावताना दिसत आहे. अनेकांनी या वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी अमेक बेतही आखले आहेत. पण, त्याआधी हवामानाचा अंदाज पाहिला का? हवामान विभागाच्या माहितीनुसार वर्षअखेरीस राज्याच्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे. किमान तापमानात काही अंशांची वाढ नोंदवण्यात येत असली तरीही राज्यात गारठा मात्र टिकून राहणार आहे. त्यामुळं थंडीचा सामना करण्यासाठीची तयारी करूनच पुढचे बेत आखलेलं उत्तम. (Maharashtra weather news)
महाराष्ट्रात धुळे (8 अंश), परभणी (9 अंश) आणि निफाड (9.3 अंश) या भागांमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. तर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या भागांमध्ये रात्रीच्या तापमानात मोठ्या फरकानं घट झाल्याचं निदर्शनास आलं. पुढील दोन दिवस हे हवामान कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
देशाच्या उत्तरेकडे थंडीचं प्रमाण वाढलं असून, काश्मीरच्या खोऱ्या सध्या 'चिल्लई कलां' हा काळ सुरु झाला आहे. ज्यामुळं या भागावरून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम देशातील उर्वरित राज्यांमध्ये कमीजास्त प्रमाणात दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही थंडी वाढली असून, दिवसा मात्र तापमानात काही अंशांनी वाढ पाहिली जात आहे. असं असलं तरीही या भागांमध्ये ही थंडीची लाट दीर्घकाळासाठी टीकून राहील हाच अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
इथं महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह नवी मुंबई, पालघर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्येसुद्धा थंडीनं जोर धरला असला तरीही मुंबई शहरावर मात्र भलतंच संकट ओढावलेलं दिसत आहे. शहरातील किमान तापमानात काहीशी घट झाली असली तरीही हवेतील धुरक्यांचं प्रमाण मात्र घातक पातळीवर पोहोचलं आहे. ज्यामुळं शहरातील नागरिकांना श्वसनाच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. शहरामध्ये सुरु असणारी बांधकामं, वाहनांची ये-जा या आणि वाऱ्याचा मंदावलेला वेग यामुळं हवेत असणाऱ्या धुलिकणांना पुढं जाण्यास वाव नसून ते एकाच ठिकाणी बराच वेळ तरंगत असल्यामुळं शहराला धुरक्यानं विळख्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या कारणास्तव सध्या शहरातील दृश्यमानतासुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.