'मनातले मुख्यमंत्री’ प्रकरणी बरसले देवेंद्र फडणवीस, म्हणाले, अजित पवार यांना स्पष्ट…

एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

Updated: Jul 24, 2023, 07:10 PM IST
'मनातले मुख्यमंत्री’ प्रकरणी बरसले देवेंद्र फडणवीस, म्हणाले, अजित पवार यांना स्पष्ट… title=

Devendra Fadnavis : राज्यात मुख्यमंत्री बदलण्याच्या कथित चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम लावला आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. शिवसेना बाळासाहेब ठाकरेचे नेते एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. अशा अफवा कुणीही पसरवू नये. यासंदर्भात अजित पवार यांनाही स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  मनातले मुख्यमंत्री प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बरसले आहेत.  मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा म्हणजे वावड्या आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करणार आहे.  शरद पवारांना मोदी-शहांकडून एनडीएत सामील होण्याची ऑफर म्हणजे अफवा असल्याचेही ते म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांनी मांडली अधिकृत भूमिका

एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याची अधिकृत भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या केवळ अफवाच असल्याचंही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदेंसह 16 जण अपात्र ठरणार आहेत असा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.  एकनाथ शिंदेंसह 16 जण अपात्र झाल्यामुळे अजित पवार लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा चव्हाणांनी केला. ही शक्यता फडणीसांना फेटाळून लावली आहे.  चव्हाण पतंगबाजी करत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 10 ऑगस्टपर्यंत राज्यात बदल होतील असं पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत. मात्र,  असं काहीच होणार नसून झालाच तर मंत्री मंडळ विस्तार होईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

नेमकं काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांची भेट म्हणजे निरोपसमारंभ होता का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित केला आहे. उद्यापासून 10 ऑगस्टपर्यंत राज्यात बदल होतील, अशी राजकीय भविष्यवाणी त्यांनी केली. 

मुख्यमंत्री बदलाबाबत विधान करणा-याची अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली

मुख्यमंत्री बदलाबाबत विधान करणा-या मंत्री अनिल पाटील, मंत्री धर्मराव बाबा अत्राम आणि आमदार अमोल मिटकरी यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच त्यांनी या तिघांना झापल्याचं समजतंय. त्यामुळे अनिल पाटलांनी शिंदेंची माफी मागितली. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार यावरून चर्चा सुरू होती आणि यात राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी विधानं केल्यामुळे या चर्चेला आणखीनच हवा मिळाली. त्यामुळे अजितदादा नाराज होते.