नागपूर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कापरं भरलं आहे, त्यांना जेवणही जात नाही आणि पाणीही पीता येत नाही, त्यामुळेच नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवण्यात आली, असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पाळत का ठेवली जात आहे, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
नागपूरमध्ये पोलिसांच्या मारहाणीत दिव्यांग मनोज ठवकर यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मनोज ठवकर यांच्या कुटुंबियांची फडणवीस यांनी भेट घेतली. मनोज ठवकर यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत झाली पाहिजे, त्यांच्या पत्नीला नोकरी दिली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. मनोज ठवकर हे कोठडीत नव्हते. ते गुन्हेगार नव्हते. मास्क लावला नाही हा काही मोठा गुन्हा ठरत नाही. पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर यांचा मृत्यू झाला, ही एक प्रकारे हत्याच असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. यावेळी ठवकर कुटुंबांना भाजपकडून 2 लाखांची आर्थिक मदतही देण्यात आली.
दरम्यान, नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे. नाना पटोले यांच्या आरोपातून एकमेकांवर किती अविश्वास आहे, हे महाराष्ट्रातील जनतेसमोर पुन्हा एकदा आलं आहे, जर तीन पक्ष एकत्रित नसतील तर महाराष्ट्रातील जनतेचा काय विश्वास संपादन करणार अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. सरकारमधल्या तिन्ही पक्षांमधील आत्मविश्वास हरवला आहे, राज्य सरकारमधीलच मंत्री आव्हानाची भाषा करतात, त्यामुळे हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.