धामणा प्रकल्प ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जालना जिल्ह्यातील शेलुद येथील धामणा धरण परिसरात झालेल्या पावसाने ओव्हरफ्लो झाले आहे.

Updated: Jul 6, 2019, 01:22 PM IST
धामणा प्रकल्प ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालना जिल्ह्यातील शेलुद येथील धामणा धरण परिसरात झालेल्या पावसाने ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विभागीय आयुक्तांच्या पाहणीनंतर धरण परिसरात सुरक्षित उपाययोजना म्हणून नागरिकांच्या स्थलांतरासंदर्भात अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर धरण क्षेत्रात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्रात एक बोट देखील तैनात करण्यात आली असून धरणाच्या सांडव्याला लागलेली गळती थांबवण्यासाठी सिमेंट आणि ताडपत्रीचा वापर केला जातोय. धोका टाळता यावा यासाठी जेसीबीच्या सहाय्याने नदी पात्राच्या खोली करणाचे कामही करण्यात येत आहे. 

धामणा धरण 3 दिवांपुर्वीच ९० टक्के भरले असून धरणापासून कोणताही धोका नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. धरणाच्या सांडव्यातील भिंतीतून मोठी गळती होत असल्याने नदीच्या परिसरातील चार गावातील नागरीकांना खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. 

धरणक्षेत्रात खोदल्या जाणाऱ्या विहिरीत ब्लास्टींग घेतल्याने या धरणाच्या भिंतीला तडे गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी भेट गळतीची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ धरणातील पाणी गळतीबाबत उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धामणा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली होती. प्रकल्पातील वाढत्या पाणी साठयामुळे धामणा धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला मोठे तडे गेले होते. थेट या भिंतीतूनच पाणी वाहू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.